हिंमत-ए-मर्दा...

संदीप काळे
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

आशेवर जगणाऱ्यांची नोंद नाही
मराठवाठ्यात गेल्या वर्षभरात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, ज्याची शासनदरबारी नोंद आहे; पण ज्यांनी संयम ठेवून आज नसलं तरी उद्या आपल्या पदरात चांगले दिस येतील, या आशेवर जगणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र कुठेही नोंद नाही. वास्तविक पाहता अशी नोंद घेण्यासारखे लाखो शेतकरी मराठवाड्यात आहेत. ज्यांनी कधी आत्महत्येचा विचारही मनात आणला नसेल.

औरंगाबादचा दौरा करून मी जालना येथे निघालो. नगरसोल पॅसेंजरमधून प्रवास करू लागलो. माझ्या बाजूला असलेल्या एका व्यक्तीला मी विचारलं, ‘कुठे जाताय?’ तो म्हणाला, ‘जालन्याला.’ मी म्हणालो, ‘तेथे काय करता?’ तर ते म्हणाले, ‘मी प्राध्यापक आहे.’ गाडीच्या त्रासाबद्दल ते म्हणाले, ‘बाराही महिने गाडीत पाय ठेवायला जागा नसते. गाड्यांची संख्या बोटावर मोजण्याइतक्‍या आणि लोकं अव्वाच्या सव्वा. तिकीट वाढतं; पण गाड्या वाढत नाहीत. मराठवाड्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सगळ्याच गाड्यांची ही अवस्था आहे.’ 

मराठवाड्यात असे एकही गाव नाही, जिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. मी अशा गावाच्या शोधात होतो, की जिथे एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. जालन्यापुढे कोडी स्टेशनला मी उतरलो. थोडंसं पुढे गेल्यावर भुतेगावात शिरलो. बळिराम बाबासाहेब भुतेकर या शेतकऱ्याच्या घरी गेलो. या शेतकऱ्याकडे अडीच एकर शेती. गेल्या दोन वर्षांपासून बळिरामच्या शेतामध्ये पाणीच पडलं नाही. बळिरामाला दोन मुलं, अनेक वेळा संध्याकाळी काय खावं, याची समस्या उभी राहते; पण बळिराम आणि त्याच कुटुंब या आपत्तीपुढे खचलेलं नाही. बळिराम सांगत होता, की माझ्या परिसरातील ओळखीचे लोक निसर्गाच्या कोपाला कंटाळून गळ्याला फास लावून घेतात; पण असा विचारही कधी माझ्या मनाला शिवला नाही. देवाने एवढं चांगलं आयुष्य दिलं असताना त्याचा गळा का घोटावा? पोटाला चिमटा देत, बळिरामने आपल्या सोमेश्‍वर नावाच्या मुलाला बारावीपर्यंत शिकवलं होतं; तर वैभव नावाच्या मुलाला दहावीपर्यंत शिकवलं. असे अनेक निर्भय बळिराम या पंचक्रोशीत मी पाहिले... 

गावच्या निवडणुकीत बळिरामाला रस नाही. तो म्हणतो, निवडणुकांमुळे काहीही होत नाही. गावात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शेतात पाणी नाही, सगळी कामं अर्धवट आहेत, अशा परिस्थितीत निवडणुकीत रस ठेवून काय फायद्याचे? परिस्थिती नेहमी वाईट असते; पण मी कधीच खचून जात नाही. 

बळिरामाच्या कुटुंबाचा निरोप घेऊन मी पुढे निघालो. चापडगाव कार्ला रस्त्यात अशी अनेक गावे सापडली, जी बळिरामाच्या गावासारखी होती. जालना हा नेहमी राजकारणातील चर्चेचा विषय असतो तो मुंबईत; पण प्रत्यक्षात जालन्याच्या ग्रामीण भागाची काय अवस्था आहे हे विचारू नका. रस्त्याने जाताना गाडी चाळीसच्या वर जाऊच शकत नव्हती, अशी त्या रस्त्यांची अवस्था होती. दुपारी रस्त्यावर काय दिसत होतं? वाळलेल्या मोसंबीच्या लाकडांची वाहतूक करणारी, चारा नेणारी वाहनं. टॅंकर, रिकामे हंडे घेऊन जाणाऱ्या महिला. जिकडे पाहावं तिकडे दुष्काळ. जालन्यापासून परभणीपर्यंत जवळजवळ सारखंच चित्र. 

Web Title: Reporter Diary Sandeep Kale