
बीसीजीच्या धर्तीवर रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी लस निर्माण करता येईल का, यावर हे संशोधन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने काही प्रयोगही झाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत दिली.
लातूर : मुंबईच्या हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेच्या सहकार्याने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून कोरोना प्रतिबंधक लसीसाठी संशोधन सुरू आहे. बीसीजीच्या धर्तीवर रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी लस निर्माण करता येईल का, यावर हे संशोधन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने काही प्रयोगही झाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत दिली.
देशमुख म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांवर तज्ज्ञांनी ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार (प्रोटोकॉल) उपचार करण्यात येतात. यात रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येतात. लक्षणे दिसताच तातडीने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपचाराअंती बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. लक्षणे दिसूनही उशिराने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. लहान वयात दिल्या जाणाऱ्या बीसीजी लसीप्रमाणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या लसीचे संशोधन करण्यात येत आहे. या लसीचा कोरानाबाधित रुग्णांच्या उपचारासाठीही उपयोग करता येईल, या दृष्टीने संशोधन सुरू आहे.
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आतापर्यंत तीन लाख स्वॅबची तपासणी करण्यात आली असून, तपासणी प्रयोगशाळांची संख्याही चारवरून ऐंशी केली आहे. विविध उपाययोजनांतून अत्यंत बारकाईने काम सुरू असल्याचे देशमुख म्हणाले. कोरोनाशी लढा देताना पाणीटंचाई निवारण, गरजूंना स्वस्त धान्याचे वाटप, मजुरांच्या हाताला नरेगातून काम, तलाव, कोल्हापुरी बंधारे व अन्य जलसंधारणाच्या योजनांची देखभाल-दुरुस्ती करण्याकडेही लक्ष देण्यात येत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, माजी आमदार वैजनाथ शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यात पंधरा वर्षांनंतर कापूस खरेदी केंद्र, जिल्हा प्रशासनाला यश
वर्ष सावधानतेचे
कोरोनावर पावसाळ्यापूर्वी नियंत्रण आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. सुरक्षा उपाययोजनांची जबाबदारी लोकांनी निभावली तर कोरोनावर लवकरच मात करता येईल. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, चेहऱ्याला स्पर्श न करणे, निर्जंतुकीकरण आदी गोष्टी अंगवळणी पाडून घ्याव्या लागतील. उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णांकडून बरेच काही शिकता येईल. त्यामुळे रुग्णालयाबाहेरच कोरोनाशी लढा द्यावा लागेल. पाचवा, सहावा लॉकडाउन असेल की नाही किंवा तो कसा असेल हे सांगता येणार नाही. तरीही हे वर्ष सावधानतेचे असेल, असेही देशमुख यांनी सांगितले.