esakal | औरंगाबाद : मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांच्यासह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

औरंगाबाद : मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद - पक्षातर्फे कोणतेही कार्यक्रम न येणे, जिल्ह्यातील नेतृत्वहीन ठरलेला पक्ष आणि पक्षातील अंतर्गत वादातून खालावत असलेली प्रतिमा याकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांच्यासह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसे नेत्यांना आजच राजीनामे पाठवल्याचे कुलकर्णी यांनी रविवारी (ता. एक) पत्रकार परिषदेत सांगितले. 

0श्री. कुलकर्णी म्हणाले, "मनसेच्या स्थापनेपासून मी सोबत आहे. सुरवातीला मनविसेत जिल्हा सचिव असताना मराठी शाळा टिकवण्यासाठी आंदोलन, महापालिका शाळेच्या दुरवस्थेबाबत आंदोलन, महापालिका सायकल घोटाळ्याबाबत आंदोलन याद्वारे शिक्षण क्षेत्रातील प्रश्‍नांना वाचा फोडली. गुणवंत विद्यार्थ्यांचे गौरव सोहळेही राबवले. वर्षभरापूर्वी मनसेचा जिल्हा संघटक झालो. त्यानंतर भूमिगत गटारी योजनेतील घोटाळ्यावरून आक्रमक झाल्यानंतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. पाणीपट्टीच्या अतिरिक्‍त करांविरोधात हिटलर आंदोलन केले. दंडुका मोर्चातही मोठा सहभाग नोंदविला; मात्र स्थानिक पातळीवर कोणताही अजेंडा नाही. लोकसभा होऊन विधानसभा आली तरी राजकारणात काम करण्याची संधी मिळत नाही. यापुढे वैयक्‍तिक कारणास्तव जिल्हा संघटक आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हेल्परायडर्स या सामजिक चळवळीतून काम करीत राहीन. या कार्याची कुणी दखल घेईल.त्यांच्यासोबत राहीन.'' 

यावेळी कुलकर्णी यांच्यासोबत पश्‍चिम विधानसभा संघटक प्रवीण मोहिते, चेतन पाटील, मनविसे जिल्हा सचिव शुभम रगडे, तुषार नरोडे, उपशहर अध्यक्ष विशाल कारभारे, नयन करमानकर, स्वप्नील घोडके, प्रथमेश दुधगावकर, शाखाध्यक्ष अनिकेत ठोकळ, रितेश जैन, कार्यकारिणी सदस्य ऍड. अक्षय बाहेती, उपविभाग अध्यक्ष अमित दायमा, सुनील घुले, विभाग अध्यक्ष अभिजित मोहिते, अरविंद शेलार यांनी राजीनामे दिले आहेत. पत्रकार परिषदेलाही यांची उपस्थिती होती. 

loading image
go to top