esakal | उस्मानाबाद : लालपरीच्या धाव्याने गजबजले बसस्थानक
sakal

बोलून बातमी शोधा

osmanabad st stand

उस्मानाबाद आगारातून पहिल्याच दिवशी पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड अशा लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्याच्या अंतर्गत भागातही बससेवा सुरु झाली आहे.

उस्मानाबाद : लालपरीच्या धाव्याने गजबजले बसस्थानक

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद :  जिल्ह्यातील बसस्थानके लालपरीच्या धाव्याने गजबजू लागली आहेत. उस्मानाबाद आगारातून पुणे, औरंगाबाद, कोल्हापूरसह लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू झाल्या असून जुनेच तिकीटाचे दर कायम राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यासह राज्यातील लालपरीची चाके रुतली होती. मार्च महिन्यापासून बससेवा बंद झाली होती. सुमारे साडेचार महिने सर्वच सेवा बंद होती. अधूनमधून जिल्ह्याच्या अंतर्गत भागात बससेवा सुरू झाली, मात्र ती केवळ कागदोपत्रीच सेवा सुरु होती. दोन-तीन प्रवाशांच्या पुढे कधी प्रवाशी मिळाले नाहीत. त्यामुळे डिझेलएवढेही उत्पन्न मिळत नव्हते. परिणामी तोटा सहन करीत सेवा दिली जात होती. महामंडळाच्या अशा परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांमध्येही धाकधूक वाढली होती. मात्र आता गुरुवारपासून (ता. २०) जिल्ह्यासह राज्यातील बससेवा सुरू झाल्याने पुन्हा बसस्थानके गजबजू लागली आहेत.

लांबपल्ल्याच्या गाड्याही सुरू... 

उस्मानाबाद आगारातून पहिल्याच दिवशी पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड अशा लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्याच्या अंतर्गत भागातही बससेवा सुरु झाली आहे. पुणे येथे जाण्यासाठी सकाळी आठ वाजता, दुपारी बारा, दोन आणि सायंकाळी साडेपाच अशा चार फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्याच्या बाहेर जाण्याच्या पासची गरज लागणार नाही.

कोरोनासाठी विशेष काळजी... 

सध्या मर्यादीत संख्येत सेवा दिली जात आहे. दरम्यान एकदा प्रवास झाल्यानंतर ती बस पूर्णपणे सॅनिटाईज करून पुढच्या प्रवासाला दिली जाते. कोरोनासाठी पुरेशी काळजी घेत आहोत. नागरिकांनीही तोंडाला मास्क बांधणे, डिस्टन्स पाळणे याची काळजी घ्यावी, असे आवाहन महामंडळाच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पूर्वीचाच तिकीट दर... 

एसटी बससेवा बंद झाल्याने अनेक खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले होते. मात्र एसटी महामंडळाचे प्रवाशी वाहतूकीत कोणताही बदल केलेला नाही. कोरोनामुळे झालेले नुकसान सहन करूनही जुन्याच दराने प्रवाशी वाहतूक केली जाणार आहे.

उस्मानाबादचे विभागीय वाहतूक अधिकारी अश्वजित जानराव म्हणाले, सध्या काही ठिकाणच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर पूर्वीप्रमाणे सर्वच फेऱ्या सुरू होतील. सध्या तिकीटाचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणाताही बदल केलेला नाही. प्रवाशांनी कोरोना संसर्गाची काळजी घेऊन सहकार्य करावे. महामंडळ आपल्याचा माफक दरात चांगल्या दर्जाची सेवा देण्यास कटीबद्ध आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top