पाऊणशे वर्षांच्या आजोबांनी असे भरले आयुष्यात रंग : Video

संदीप लांडगे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

  • निवृत्त उपायुक्तांनी दिली एलिमेंटरी परीक्षा 
  • पशुसंवर्धन खात्यात उपायुक्त म्हणून प्रशासकीय सेवेत होते
  • जन्मजात रंगांधळेपणा (कलर ब्लाईण्डनेस)वर केली मात
  • आत्तापर्यंत वेगवेगळी पाच हजार चित्रे काढली

औरंगाबाद : कलेला वयाचे बंधन नसते; मात्र अनेकांना उमेदीच्या काळात कुटुंब, नोकरी, व्यवसाय यामुळे आवड असूनही कलेची जोपासना करणे शक्‍य होत नाही. मग उतारवयात याची रुखरुख लागते. आता वय झाले, आवड आणि कला जोपासण्यासाठी प्रकृती साथ देत देत नाही, असे अनेक जण म्हणतात; पण याला अपवाद ठरले आहेत डॉ. अरुण चौधरी. चित्रकलेचा छंद जोपासण्यासाठी वयाच्या पंचाहत्तरीतही डॉ. चौधरी यांनी बुधवारी (ता. 27) कला संचालनालयातर्फे घेण्यात येणारी एलिमेंटरी परीक्षा दिली. 

गारखेडा परिसरातील डॉ. आर. पी. नाथ हायस्कूल येथील एलिमेंटरी परीक्षेच्या केंद्रावर लहान मुलांमध्ये अगदी उठून दिसणारे आजोबा मग्न होऊन स्वतः काढलेल्या चित्राला रंग देताना तल्लीन झाले होते. शहरातील हिंदू राष्ट्र चौक गारखेडा परिसरात राहणारे डॉ. चौधरी हे पशुसंवर्धन खात्यात उपायुक्त म्हणून प्रशासकीय सेवेत होते. 

सेवानिवृत्तीनंतर काय करावे? असा प्रश्‍न त्यांना पडला. सुरवातीला संगीत शिकण्यास सुरवात केली; पण संगीतामध्ये विशारद घेण्यासाठी सात वर्षे लागतात. उतार वयात सात वर्षे संगीत शिकण्यासाठी वेळ देणे शक्‍य नव्हते. नातीला चित्रकलेची आवड होती. तिच्या सोबत चित्र काढायची, रंगवायची सवय कधी छंद बनला हे समजलेच नाही. डॉ. चौधरी यांना जन्मजात कलर ब्लाईण्डनेस आजार (रंगांधळेपणा) असल्यामुळे रंग लवकर कळत नाहीत; मात्र चित्रकलेच्या छंदामुळे आयुष्यात रंगाची उधळण झाली आहे. रात्री झोप लागली नाही की, चित्र काढायला घेतो. आत्तापर्यंत वेगवेगळी पाच हजार चित्र काढले आहेत. त्याचे प्रदर्शनही भरवले असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. चौधरी हे मूळचे मुदखेड (जि. नांदेड) येथील आहेत. त्यांचा जन्म 1944 चा असून, गेल्या महिन्यातच त्यांनी वयाचे 75 वर्षे पूर्ण केले. त्यांना एक मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. मुले उच्च पदावर नोकरी करतात. नातीने एमटेक पूर्ण केले आहे. 

इंटरमिजिएट परीक्षाही देणार 

कला ही शिक्षणाचा पाया आहे. सेवानिवृत्तीला सतरा वर्षे झाली आहेत. त्यानंतर घरी बसून न रहाता, काहीतरी छंद जोपसाण्यासाठी चित्रकलेचा छंद जोपासला. कलर ब्लाईंडनेसचा विकार असल्यामुळे हिरवा, लाल, निळा असे रंग कळत नाहीत. त्यामुळे लग्नानंतर फक्त काळी पॅंन्ट व पांढरा शर्टच घातला आहे. शरीराने साथ दिली तर पुढील वर्षी इंटरमिजिएटची परीक्षा देणार आहे. 

चित्रकला ही पारंपरिक कला आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्वच शाखांमध्ये चित्रकलेला लागतेच; मात्र शासनाकडून कला विषयच शिक्षणातून हद्दपार केला जात आहे. शाळेत कला शिक्षक पदासाठी अतिथी शिक्षक म्हणून नेमणूक करण्याचे शासनाने धोरण योजले आहे. या अतिथी शिक्षकाला 50 रुपये मानधन देण्याची तरतूद शासनाने केली असल्यामुळे कला शिक्षकांमध्ये कलेबद्दलच उदासिनता निर्माण झाली आहे. त्यामुळे कलेला शासनाने प्रोत्साहान देण्याचे प्रयत्न करावेत. 
- डॉ. अरुण चौधरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired Deputy Commissioner enrolled in Elementary Exam