कळमनुरीत बारा हजार गावकऱ्यांची घरवापसी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

तालुक्यातील ग्रामीण भागात मागील दोन महिन्यांत ११ हजार ९७१ ग्रामस्थ आपल्या मूळ गावी परत आले आहेत. यापैकी नऊ हजार २३५ ग्रामस्थांनी १४ दिवस विलगीकरण कक्षात वास्तव्य केले.
 

कळमनुरी(जि. हिंगोली) : आजार व संकटाच्या काळात कामासाठी स्थलांतर करणारे तालुक्यातील अकरा हजार ९७१ नागरिक आपल्या मूळ गावी परतले आहेत. यापैकी नऊ २३५ नागरिकांनी १४ दिवसांचे विलगीकरण पूर्ण केले आहे. अजूनही दोन हजार ७३६ नागरिक विलगीकरण कक्षामध्ये वास्तव्याला आहेत. यापैकी केवळ आठ नागरिकांना आजाराचा संसर्ग झाल्याचे निदान समोर आले आहे.

महानगरांत कामानिमित्त गेलेल्या गावकऱ्यांनी कोरोनाचे संकट उभे राहिल्यानंतर तेथील परिस्‍थती पाहून आपल्या मूळ गावी परतायला सुरवात केली होती. सुरवातीच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद असतानाही जमेल त्या पद्धतीने नागरिकांनी आपले गाव गाठले.

हेही वाचा - ‘या’ माफियांवर आली संक्रांत, महसुल पथकाने ४० तराफे जाळले

विलगीकरण कक्षामध्ये थांबणे बंधनकारक

मात्र, अनेक ठिकाणी परत आलेल्या नागरिकांना गावातील रोषालाही सामोरे जावे लागले. त्यामुळे काही ठिकाणी वादाचे प्रकारही घडले. या परिस्थितीत प्रशासनाकडून बाहेर गावावरून आपल्या गावी परतलेल्या गावकऱ्यांना १४ दिवस विलगीकरण कक्षामध्ये थांबणे बंधनकारक करण्यात आले होते. यासाठी गावातील शाळा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी गावकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

परत आलेल्या नागरिकांच्या नोंदी

 काहींनी स्वेच्छेने आपापल्या शेतात थांबत विलगीकरणाचा काळ पूर्ण केला. तालुक्यातील ग्रामीण भागामधून मार्च महिन्याच्या सुरवातीपासून परत आलेल्या नागरिकांच्या नोंदी आरोग्य विभागाकडून घेण्यात आल्या. या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना विलगीकरण कक्षामध्ये थांबणे बंधनकारक करण्यात आले होते.

नऊ हजार २३५ ग्रामस्थांना कुठलीही लक्षणे नाहीत

शहरी भाग वगळता तालुक्यातील ग्रामीण भागात मागील दोन महिन्यांत ११ हजार ९७१ ग्रामस्थ आपल्या मूळ गावी परत आले आहेत. यापैकी नऊ हजार २३५ ग्रामस्थांनी १४ दिवस विलगीकरण कक्षात वास्तव्य केले. त्यांना कुठल्याही आजाराची लक्षणे नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दोन हजार ७३६ ग्रामस्थ विलगीकरणमध्ये

सद्य:स्थितीत अजूनही दोन हजार ७३६ ग्रामस्थ विलगीकरण कक्षामध्ये वास्तव्याला असून यामध्ये शाळा, घर व शेतात वास्तव्याला असलेल्या या गावकऱ्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होणे शिल्लक आहे. एकंदरीत तालुक्यातील बाहेरून आलेल्या व्यक्तींपैकी केवळ आठ ग्रामस्थांना आजाराचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

येथे क्लिक करा - कंधारमध्ये भूमिपुत्रांची ‘इनकमिंग’ चिंतेचा विषय

नागेशवाडी येथे आरोग्य तपासणी

औंढा नागनाथ : तालुक्यातील नागेशवाडी येथे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे रविवारी (ता. ३१) खबरदारी म्‍हणून प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. या वेळी दवंडी देत मास्‍क वापरा, सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करा, याची माहिती देण्यात येत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले आहे.

गावात येणारे रस्‍ते केले बंद

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, गटविकास अधिकारी जगदीश साहू, ग्रामसेवक राम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पी. जी. जमरे, वैद्यकीय अधिकारी चक्रधर तुडमे, एस. टी. जोगदंड, एस. पी. जाधव, आशा वर्कर केसर नाईक यांच्यासह आरोग्यसेवक, आशा वर्कर, अंगणवाडीताई, मदतनीस सर्वेक्षण करीत आहेत. तसेच गावात येणारे रस्‍तेदेखील बंद करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Return Of Twelve Thousand Villagers To Kalamanuri Hingoli News