लातूरकर रोहित इंडियन आयडॉलमध्ये दुसरा; म्हणाला, ट्रॉफीपेक्षा मने जिंकली !

Indian Idol Rohit Raut Latur
Indian Idol Rohit Raut Latur

लातूर : स्पर्धा म्हटले की जिंकणे, हारणे आलेच. पण, याहीपेक्षा आणि स्पर्धेत मिळणाऱ्या ट्रॉफीपेक्षा आपण आपल्या स्वरांच्या माध्यमातून किती लोकांची मने जिंकली, हे जास्त महत्वाचे असते, अशा भावना गायक रोहित राऊत याने सोमवारी (ता.२४) व्यक्त केल्या. 'इंडियन आयडॉल'मध्ये दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोचणे ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. या आणि आजवरच्या माझ्या यशात लातूरकरांचा मोठा वाटा आहे, असेही तो म्हणाला.


इंडियन आयडॉलच्या अकराव्या सीझनच्या अंतिम फेरीत एकाहून एक सुरेल गायकांचा सहभाग असल्याने या स्पर्धेत कोण बाजी मारणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर रविवारी (ता. २३) निकाल जाहीर झाला. यात सनी हिंदुस्थानी (भटींडा) हा विजेता ठरला तर मराठमोळा रोहित राऊत (लातूर) हा उपविजेता ठरला. याबाबत 'सकाळ'ने रोहितशी संवाद साधला.


रोहित म्हणाला, या स्पर्धेत मी दुसरा क्रमांक मिळवला, याचाही खूप मोठा आनंद आहे. माझा परफॉर्मन्स उत्कृष्ट राहील, यावर भर दिला होता. कुठेही कमी पडलो नाही, असे मला वाटत आहे. प्रेक्षकांचे-श्रोत्यांचे व्होटिंगही मला मोठ्या प्रमाणात मिळाले. त्यांचे हे प्रेम आहे. महाराष्ट्रातील आणि लातुरकरांनी कायमच मला पाठिंबा दिला. यातून मला एक प्रकारचे बळ मिळत गेले. आजवरच्या यशात लातूरकरांचा मोठा वाटा आहे. कारण संगीताच्या शिक्षणाची सुरवात खऱ्या अर्थाने लातुरातून झाली. हे मी कधीही विसरू शकत नाही.


सुरेश वाडकरांच्या
तालमीत घडला रोहित

रोहितचा जन्म अकोल्यात झाला. त्यानंतर लगेचच मार्केटिंगच्या व्यवसायामुळे रोहितचे वडील आपल्या कुटुंबासह लातुरात स्थायिक झाले आणि राऊत कुटुंबीय लातूरकर बनले. रोहितचे बालपण लातुरात गेले. येथील देशीकेंद्र शाळेत त्याने शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर मुक्त विद्यापीठात संगीत विषयक शिक्षण घेतले. लातुरात जगतकर मॅडम, विठ्ठल जगताप आणि गुरुवार संगीत विद्यालयात त्याने गायनाचे शिक्षण घेतले. याच दरम्यान, झी टीव्हीवरील सारेगमप लिटल चॅम्प्स या कार्यक्रमात त्याने भाग घेतला होता.

लिटल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वातील अंतिम ५ स्पर्धकांमध्ये त्याने स्थान पटकावले. मुंबईत गेल्यानंतर पुढे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्याकडून गायनाचे धडे मिळाले. रोहितने अनेक मराठी चित्रपट व मालिकांसाठी पार्श्वगायन केले आहे. दुनियादारी या चित्रपटातून त्याने पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले. तर 'मोगरा फुलला' या चित्रपटाद्वारे त्याने संगीत दिग्दर्शक म्हणूनही पदार्पण केले. वजनदार, प्यार वाली लव्ह स्टोरी, कान्हा, फुंतरू, वन वे तिकीट, बे दुणे साडेचार, का रे दुरावा अशा वेगवेगळ्या चित्रपट-मालिकांत रोहितने गाणी गायली आहेत. त्यामुळे रोहितचे नाव घराघरांत पोचले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com