धनंजय मुंडे काका-सोबत की पुतण्यासोबत....

दत्ता देशमुख
Saturday, 23 November 2019

- बीडचे पुतणे काकासोबत की पुतण्यासोबत - राजकीय भूकंपात धनंजय मुंडे यांची भूमिमा अद्याप स्पष्ट नाही - संदीप क्षीरसागर यांच्या भूमिकेकडेही लक्ष - दोघांही आपापल्या काकांच्या विरोधात केले होते बंड

बीड - राज्यात झालेल्या राजकीय भूकंपात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. परंतु, काकांना आव्हान देऊन बंड करणारे धनंजय मुंडे व संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत राहणार की अजित पवार यांच्यासोबत हे पाहावे लागणार आहे.

वर्ष 2012 मध्ये धनंजय मुंडे यांनी काका दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात बंड पुकारत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तत्पूर्वीही धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाच्या विषयाला शरद पवार अनुकूल नव्हते. अलीकडे मात्र शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले आहे. तर, संदीप क्षीरसागर यांनीही काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना आव्हान देत बंड पुकारले. दरम्यान, या निवडणुकीत हे बंडखोर दोन्ही पुतणे विजयी झालेले आहेत. परंतु, शनिवारी अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही अजित पवार यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता काकांची एक आणि पुतण्याची एक आशा दोन भूमिका झाल्या आहेत. त्यामुळे बीडचे धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर हे दोन पुतणे काका शरद पवार यांच्या भूमिकेचे समर्थन करणार की पुतणे अजित पवार यांच्या भूमिकेचे हे पाहावे लागणार आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या...
राज्याला अस्थिरतेमधून बाहेर पडणे अत्यंत आवश्यक होत. ते काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, अशी प्रतिक्रिया राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत आज अनुक्रमे सकाळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपाला जनादेश होता त्याचा सन्मान झाला असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Role of Dhananjay Munde in Maharashtra's politics