दहा एकर सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरविले रोटाव्हेटर

राजेश दारव्हेकर
Saturday, 17 October 2020

सतत झालेल्या पावसाने खराब झालेले सोयाबीन काढण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील शेतकऱ्याने दहा एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला आहे.

हिंगोली : कोरोनाच्या संकटाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवीनच संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांचे खरिपातील नगदी पीक म्हणजे सोयाबीन परतीच्या पावसाने खराब झाले आहे. सतत झालेल्या पावसाने खराब झालेले सोयाबीन काढण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील शेतकऱ्याने दहा एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला आहे. तर, आणखी दोन शेतकरी १५ एकर क्षेत्रावर रोटावेटर फिरवण्याच्या तयारीत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे पावसाने नुकसान झाले आहे, सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील ज्ञानबा कोटकर  यांच्याकडे दहा एकर शेती आहे. त्यांनी सोयाबीनची पेरणी केली. सुरुवातीपासून चांगला पाऊस असल्याने सोयाबीनची वाढ चांगली झाली होती. मात्र, शेंगा कमी लागल्या. आता परतीच्या पावसात आलेल्या शेंगाही पूर्णपणे भिजल्या. सोयाबीनचे एक पोते काढण्यासाठी तीन हजार रुपये तर, मळणी यंत्रामधून काढण्यासाठी एक क्विंटलला बाराशे रुपये मोजावे लागतात. अगोदरच सोयाबीनला शेंगा कमी आणि त्यात काढणीसाठीही जास्त खर्च परवडणारा नाही. त्यामुळे कोटकर यांनी दहा एकरवर रोटावेटर फिरवण्यास सुरुवात केली आहे. 

शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला

ज्ञानबा यांचे अनुकरण करत परिसरातील काही शेतकऱ्यांनीही आपल्या शेतातील सोयाबीनवर रोटावेटर फिरवण्याची तयारी सुरू केली आहे. परतीच्या पावसाचा कहर -सुरुवातीला योग्य प्रमाणात पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे पीक जोमात होते. मात्र, पीक तयार झाले आणि जोरदार परतीच्या पावसाला सुरुवात झाली. यात हजारो हेक्टर सोयाबीनचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यामुळे मन घट्ट करून पीक नष्ट करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे शेतकरी सांगत आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन काढून टाकले. मात्र, सोयाबीन गोळा करण्याच्या वेळी आलेल्या पावसाने सोयाबीनला पूर्णपणे बुरशी लागली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी देखील सोयाबीन गोळा करण्याचे सोडून दिले आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी देखील नुकसानीची पाहणी केली

नेत्यांच्या भेटी, तरीही पंचनामे नाहीच . जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री, कृषिमंत्री एवढेच नव्हे तर, विरोधी पक्षनेत्यांनी देखील नुकसानीची पाहणी केली. मात्र, त्यांच्या पाहणीनंतरही नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे आता शासनाकडून काही नुकसान भरपाई मिळेल, याची आशाच सोडून दिल्याचे शेतकरी पोटतिडकीने सांगत आहेत. सोयाबीनशिवाय आमच्याकडे दुसरे काहीही नाही. त्यावरही रोटावेटर फिरवण्याची वेळ आल्याचे  शेतकरी अर्जुन कोटकर यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात शेतीची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. शासन आता शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय टाकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotavator rotated by farmer on ten acres of soybeans hingoli news