कोरोनाचा परिणाम ः बंदीत भुकेल्यांना रोटी, कपडा, मकान बँकेचा आधार

युवराज धोतरे
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या संचार बंदित भिकारी, रस्यावर भटकणारे मतिमंद कष्टकरी, मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये, उपाशी पोटी राहू नये म्हणून येथील रोटी कपडा मकान बँकेच्या वतीने शहरात फिरून भुकेल्यांना अन्न वाटपाची सोय करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

उदगीर (जि.लातूर) : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या संचार बंदित भिकारी, रस्यावर भटकणारे मतिमंद कष्टकरी, मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये, उपाशी पोटी राहू नये म्हणून येथील रोटी कपडा मकान बँकेच्या वतीने शहरात फिरून भुकेल्यांना अन्न वाटपाची सोय करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून शहरात संचारबंदीमुळे मंदिर, मशिद, रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि मुख्य रस्त्याशेजारी आश्रय घेतलेल्या निराधाराचे अन्ना वाचून हाल होत आहे. रोजच्या गर्दीत भीक मागून कशी तरी गुजारन व्हायची. मात्र, बंदमुळे भिकही मागता येत नाही. त्यामुळे पोटातली भुकेची आग विझवायची कशी? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. ही बाब रोटी कपडा मकान बँकेने हेरली. या बँकेच्या स्वयंसेवकांनी गेल्या तीन दिवसापासून शहरातील रस्त्यावर बसस्थानक रेल्वे स्टेशन व शहरातील मुख्य रस्ते शेजारी रात्री-अपरात्री आढळलेल्या निराधारांना शिजवलेले अन्न पुरवठा करण्याचा उपक्रम राबवत आहे. या बँकेच्या पुढाकाराने या भिकाऱ्यांना व मतिमंदाना अन्नाची सोय होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून स्वयंसेवक रस्त्यावर, पालावर राहणाऱ्यांना तयार अन्न वाटप करत आहेत. या उपक्रमासाठी या रोटी कपडा मकान बँकेचे गौस शेख, समीर शेख, अब्दुल रहीम, जमील शेख, अहमद हैलापुरे, अखिल शेख, खुर्शीद आलम आदी स्वंयसेवक पुढाकार घेत आहेत.

`मन की बात' मध्ये उल्लेख
या रोटी कपडा बँकेच्या अशा विविध समाजपयोगी कार्यामुळे याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. दोन वर्षांपूर्वी मन की बात मध्ये या बँकेचा उल्लेख त्यांनी केला होता. बँकेच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

वाचा ः ग्रामस्थांची धास्ती सरपंचाने मिटवली, दीड हजार ‘पाहुण्यां’ची करुन घेतली तपासणी

ग्रामस्थांची धास्ती सरपंचाने मिटवली
लातूर  : पुणे, मुंबई येथून आलेल्या पाहुण्यांची ग्रामस्थांनी चांगलीच धास्ती घेतली होती. मुरूडच्या (ता. लातूर) गल्लीबोळातून सरपंच अभयसिंह नाडे यांना फोन येऊ लागले. यामुळे त्यांनी शक्कल लढवत गावात आलेल्या पाहुण्यांची एका दिवसात तपासणी करण्याचे नियोजन केले. त्यांची संकल्पना चाळीस खासगी डॉक्टरांनी उचलून धरत गुरुवारी (ता. २६) सकाळी तीन तासांत दीड हजारहून अधिक पाहुण्यांची तपासणी केली. यात एकही संशयित रुग्ण आढळून न आल्याने गावातील चर्चेला पूर्णविराम मिळाला.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात आजाराविषयी जागृतीसाठी गावात बसस्थानक, मंदिर, पाण्याच्या टाक्या आदी सहा ठिकाणी ध्वनिक्षेपकावरून तसेच घरोघरी पत्रक वाटून माहिती दिली जात आहे.
लातूर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले मुरूड गावाची लोकसंख्या मोठी आहे. पुणे व मुंबईच्या पाहुण्यांचे दर्शन ग्रामस्थांना नित्याचे झाले आहे. यात गावातही दीड हजारहून अधिक पुणे, मुंबईकर दाखल झाले आहेत. पाहुण्यांच्या आगमनाची ग्रामस्थांनी चांगलीच धास्ती घेतली असून, त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून त्याची माहिती ते ग्रामपंचायतीला देत आहेत. यात सरपंच नाडे यांना ग्रामस्थांकडून आजारी पाहुण्यांबाबत मोठ्या संख्येने फोन येऊ लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roti, Kapada, Makan Bank Distribute Foods Among Poor, Udgir