बीड : वरवंट धरणात आढळला सकर मासा

स्थानिक मत्स्यजातींसाठी धोकादायक, पीएच डी साठी संशोधन करणाऱ्यांचे मत
Sakar fish
Sakar fishSakal

अंबाजोगाई - येथील योगेश्वरी महाविद्यालयातील प्राणीशास्त्राचे प्रा. डॉ. विश्वास साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील वरवंट तथा व्हिक्टोरिया धरणात ‘सकर’ हा परदेशी मासा नुकताच आढळला. त्यामुळे परदेशी माशांचे अतिक्रमण भारतात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दौंड येथील मयूर शितोळे (जि. पुणे) व नांदेडचे शेख अझीम हे पीएच. डी साठी प्राणी शास्त्र या विषयात संशोधन करीत आहेत. राज्यातील विविध नद्या, जलाशयांतील मत्स्य जाती, त्यांचे प्रमाण, लुप्त होऊ लागलेल्या व नव्याने सापडणाऱ्या मत्स्यजातींवर त्यांचे हे संशोधन आहे. हा अभ्यास करताना त्यांना ब्रिटिशकालीन वरवंट तथा व्हिक्टोरिया धरणार सकर मासा (हेलिकॉप्टर मासा) आढळला. तो प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीत सापडतो. वेगळा आकार, विशिष्ट रंगामुळे तो शोभिवंत मासा म्हणून फिशटॅंकमध्ये वापरला जातो. या माशाचे जगभरात शंभरच्या आसपास प्रकार सापडतात. हा मासा १७ देशांत शोभिवंत मासा म्हणून आयात केला गेला आहे.

स्थानिक मत्स्यजातींना धोकादायक

हा मासा फिश टॅंकमधून कोणीतरी धरणात सोडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. धरणांत अथवा नद्यांमध्ये या माशाचा प्रवेश झाला की याची वाढती संख्या थांबविणे गरजेचे असते. हा मासा इतर मासे व त्यांची अंडीही खातो. तसेच जागा व अन्न मिळविण्यासाठी इतर स्थानिक मत्स्यजातींसोबत स्पर्धा करतो. तो खाण्यासही योग्य नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मासा पाण्याबाहेरही काही काळ जिवंत राहू शकतो. जलाशयांत या माशाचे प्रमाण वाढत राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम स्थानिक मत्स्यजातींवर होऊन कालांतराने त्या नामशेष होण्याची भीती असते. दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीत सापडणारा सकर मासा अलीकडच्या काळात गंगा नदी, मुंबईचा काही भाग व सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात सापडल्यानंतर, आता या माशाने वरंवट धरणांतही शिरकाव केला आहे. या माशाचे संशोधक विद्यार्थ्यांनी एका प्रयोगशाळेत जतन केले आहे.

आकार व खाद्य

साधारणतः १० ते १५ वर्ष आयुष्यमान असणारा हा मासा मिश्र आहारी आहे. तो पाण्यातील शेवाळ, लहान मासे व इतर माशांची अंडी देखील खातो. या माशाचे तोंड गोलाकार असून, मत्स्यवर्गातील ‘कॅटफीश’ वर्गात मोडतो. १५ ते २० सेंटीमीटर लांबीचा झाल्यावर तो प्रजननायोग्य होतो. फीशटॅंकमध्ये शोभिवंत मासा म्हणून हा भारतात वापरला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com