आजोबांना जमले नाही, ते नातवाने करून दाखवले!

हरी तुगावकर - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

लातूर - काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरची ओळख. या जिल्ह्याने देशाला व राज्याला तीन नेते दिले. पण जिल्ह्यावर मात्र दिवंगत नेते विलासराव देशमुख व माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांचेच कायमस्वरूपी वर्चस्व राहिले. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना जिल्ह्यावर कधीच एकहाती नेतृत्व करता आले नाही. पण ‘मिनी मंत्रालया’च्या निवडणुकीच्या माध्यमातून श्री. निलंगेकर यांचे नातू पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मात्र ते करून दाखवले. जिल्ह्याच्या राजकारणात आता श्री. निलंगेकरांची खरी ‘एंट्री’ झाली आहे. लातूर आणि निलंग्याची ‘संस्कृती’ वेगळी आहे.

लातूर - काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरची ओळख. या जिल्ह्याने देशाला व राज्याला तीन नेते दिले. पण जिल्ह्यावर मात्र दिवंगत नेते विलासराव देशमुख व माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांचेच कायमस्वरूपी वर्चस्व राहिले. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना जिल्ह्यावर कधीच एकहाती नेतृत्व करता आले नाही. पण ‘मिनी मंत्रालया’च्या निवडणुकीच्या माध्यमातून श्री. निलंगेकर यांचे नातू पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मात्र ते करून दाखवले. जिल्ह्याच्या राजकारणात आता श्री. निलंगेकरांची खरी ‘एंट्री’ झाली आहे. लातूर आणि निलंग्याची ‘संस्कृती’ वेगळी आहे. त्यामुळे यापुढील राजकारण कसे चालणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

देशमुखांचेच होते वर्चस्व
लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला. लातूरने माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, दिवंगत नेते विलासराव देशमुख व माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे तीन नेते दिले. यात गेली तीस-पस्तीस वर्षे दिवंगत नेते विलासराव देशमुख व माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांनी साखर कारखानदारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंक, नगरपालिकांच्या माध्यमातून जिल्ह्यावर वर्चस्व केले. लोकांनीही त्यांना भरभरून साथ दिली. 

निलंगेकरांचे मर्यादित राजकारण
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हेही पक्षाचे ज्येष्ठ नेते. त्यांनी अनेक मंत्रिपदासह मुख्यमंत्रिपदही भूषवले. ‘दिल्ली’शीही त्यांचे जवळचे संबंध राहिले. पण जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना कमांड ठेवता आली नाही. श्री. निलंगेकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला पण त्यात फारसे त्यांना यश आले नाही. त्यांचे पक्षश्रेष्ठीकडे वजन राहिले पण जिल्ह्यात ते निलंग्यापुरतेच मर्यादित राहिल्याचे लातूरकरांनी पाहिले आहे.  

काँग्रेसचा गढ चालला ढासळत 
वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसचा गढ ढासळत चालला आहे. पक्षासाठी व नेत्यांसाठी ही चिंताजनक बाब आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तर ३५ वर्षांची सत्ता हातून गेली. दहापैकी सात पंचायत समित्यांतून काँग्रेस बाहेर पडली.  महापालिकेच्या निवडणुकीत सध्या तरी फारसे आशादायक चित्र नाही. त्यामुळे या पडझडीतून काँग्रेस व नेते कसे सावरतात याकडे आता लक्ष लागले आहे.

निलंगेकरांची ‘एन्ट्री’ राजकारणाला कलाटणी
गेल्या दोन वर्षांत देशात व राज्यात भाजपची सत्ता आली. त्यात संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्रिपद मिळाले. ते पालकमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वात नगरपालिकांची निवडणूक जिंकली गेली. आता जिल्हा परिषदेवर तर त्यांनी ३५ वर्षांची काँग्रेसची राजवट उलथून टाकत एकहाती सत्ता आणली. दहापैकी सात पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा फडकविला. पालकमंत्री निलंगेकर हे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू आहेत. आजोबाला जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवता आले नाही; पण या नातवाने मात्र अवघ्या काही महिन्यांतच जिल्हा ताब्यात घेतला आहे. एक एक यशस्वी पाऊल ते पुढे टाकत आहेत.

Web Title: sambhaji patil nilangekar bjp