लोकसभेसारखी चूक करू नका: उद्धव ठाकरे

माधव इतबारे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र डौलाने भगवा फडकला. मात्र, औरंगाबादेत तुम्ही गाफील राहिलात, त्यामुळे भगवा फडकला नसल्याचे मला दुःख आहे. शहरात अनेक प्रश्‍न असून, त्याची जाणीव मला आहे. चुका झाल्या असतील, कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण लोकसभेसारखी चूक पुन्हा करू नका. येणाऱ्या पिढीला ते महागात पडेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 10) दिला. 

औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र डौलाने भगवा फडकला. मात्र, औरंगाबादेत तुम्ही गाफील राहिलात, त्यामुळे भगवा फडकला नसल्याचे मला दुःख आहे. शहरात अनेक प्रश्‍न असून, त्याची जाणीव मला आहे. चुका झाल्या असतील, कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण लोकसभेसारखी चूक पुन्हा करू नका. येणाऱ्या पिढीला ते महागात पडेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 10) दिला. 

शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे गुरुवारी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजन केले होते. व्यासपीठावर प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, प्रशांत बंब या उमेदवारांसह माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, मनीषा कायंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, डॉ. भागवत कराड, शिरीष बोराळकर, किशनचंद तनवाणी, रिपाइंचे बाबूराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 
पुढे ठाकरे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत तुमच्याकडून चूक झाली म्हणून, आम्हाला गाडण्याची भाषा केली जात आहे. सात हजार पिढ्या उतरल्या तरी भगवा खाली उतरवू शकणार नाहीत. कन्नडच्या "त्या' विश्‍वासघात्याला माफ करणार नाही. पाच वर्षात त्याच्या चुका पोटात घातल्या, पण भगव्याशी हरामखोरी खपवून घेणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा समाचार घेतला. दहा रुपयात शिवभोजन योजना सुरू करणार, गरिबांसाठी एका रुपयात आरोग्य तपासणी, तीनशे युनिटपर्यंत घरगुती वापराच्या वीजदरात 30 टक्के सूट, पंधरा लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार या आश्‍वासनांचा पुनरुच्चार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विनोद बनकर व कॉंग्रेसचे सिद्धार्थ वडमारे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. सूत्रसंचालन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले. 

पवारांना सरकार पाडण्याचा अनुभव 
भाजप-शिवसेनेला घालविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे शरद पवार सांगताहेत, हो तुम्ही स्वस्थ बसू नका, आम्हीही तुम्हाला स्वस्थ बसू देणारच नाही. तुमचा सरकार पाडण्याचा दांडगा अनुभव या महाराष्ट्राने, देशाने पाहिला आहे. वसंतदादा, अटलबिहारी वाजपेयी यांची सरकारे पाडून तुम्ही ते दाखवून दिले, अशा शब्दांत ठाकरे यांनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिले. 
 
तुमचे चाळे बघत होतो 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार या विधानावर अजित पवार यांनी "पाच वर्ष काय केले' या टीकेला देखील उद्धव ठाकरे यांनी पाच वर्ष आम्ही तुमचे चाळे पाहत होतो अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. रडतात, भेटतात, गायब होतात? काय नाटकं चालू आहेत? असा चिमटा देखील उद्धव ठाकरे यांनी काढला. 

समान नागरी कायदा करा.. 
भाजपला साथ द्यायची नाही तर कोणाला द्यायची? भाजपने जाहीरनाम्यात 370 कलम रद्द करण्याचा शब्द पाळला, आता देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणीही त्यांनी केली. 
 
पुन्हा कचऱ्याची आठवण 
शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नामुळे ठाकरे यांना जनतेची माफी मागावी लागली होती. त्याचा उल्लेख करत त्यांनी आज कचऱ्याचा प्रश्‍न राहिला का? असा सवाल उपस्थितांना केला. पिण्याच्या पाण्यासाठी 1680 कोटींची योजना आणली आहे, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: same mistake as the Lok Sabha: Uddhav Thackeray