संत ज्ञानेश्‍वर उद्यानाच्या सुरक्षा यंत्रणेचे ‘तीनतेरा’

चंद्रकांत तारू
सोमवार, 11 जून 2018

पैठण - संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांचे नव्हे, तर आता मद्यपींचे ठिकाण बनले आहे. जायकवाडी धरणाचे शिल्पकार (कै.) शंकरराव चव्हाण यांच्या उद्यानातील पुतळ्याजवळ बसून मद्यशौकिन मद्यपान करीत आहेत. उद्यानाचे अधिकारी, तेथे नियुक्त केलेले सुरक्षारक्षक हे या प्रकाराकडे डोळेझाक करीत असून, यामुळे पर्यटकांत संताप व्यक्त केला जात आहे. उद्यानाच्या सुरक्षा यंत्रणेचे ‘तीनतेरा’ वाजले आहेत. मद्यधुंद झालेल्यांचा झिंगाट उद्यानात पाहावयास मिळत आहे. 

संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कारभार जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड यांच्या अधिपत्याखाली आहे; परंतु कार्यकारी अभियंत्यांनी उद्यान व्यवस्थापनाकडे कधीच लक्ष न दिल्याने उद्यानात गैरप्रकार वाढत असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच उद्यान व्यवस्थापनाचे ‘तीनतेरा’ वाजले आहेत. उद्यानाच्या खासगीकरणानंतर शासनाने उद्यान विकासाकडे पाठ फिरविली. त्यामुळे उद्यानाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यातच उद्यानाचे वरिष्ठ अधिकारी बेफिकीरपणे वागत असल्याने उद्यानात बिअर, दारू पिऊन मद्यशौकिन आनंद घेत आहेत. पर्यटकांना उद्यानात हा घाणेरडा प्रकार पाहावा लागत आहे. उद्यानाच्या आजूबाजूला लपून बसणाऱ्या मद्यपींनी तर आता (कै.) शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी मदिरेचा झिंगाट सुरू केला आहे.

तक्रार न करताच पर्यटक जातात निघून
शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर बिअर व दारूच्या बाटल्या दिसतात. ते ठिकाण सुरक्षा रक्षकांच्या प्रवेशद्वारापासून अगदी जवळच आहे; परंतु सुरक्षा रक्षकांचा फेरफटका सुरू असताना हे सर्व घडत आहे. त्यामुळे मद्यशौकिनांची हिंमत वाढत चालली आहे. हे मद्यशौकिन मद्यधुंद झाल्यावर पर्यटकांशी विनाकारण हुज्जत घालून त्रास देत असल्याचे प्रकार येथे घडत आहेत; परंतु पर्यटक वाद नको म्हणून तक्रार न करताच निघून जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: sant-dnyaneshwar-garden-paithan