सतीश चव्हाण विजयाची हॅट्रिक करणार,राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा विश्वास

राजेश दारव्हेकर
Saturday, 28 November 2020

हिंगोली येथील शिवलिला लॉन्स येथे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी  सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

हिंगोली : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण मागील दोन 'टर्म' पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. पदवीधरांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पदवीधर मतदार सतीश चव्हाण यांना विजय करून चव्हाण हे विजयाची हॅट्रिक करणार असा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी ता. २७  सहविचार सभेत  बोलताना व्यक्त केला.

हिंगोली येथील शिवलिला लॉन्स येथे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी  सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, माजी राज्य मंत्री अर्जुन खोतकर, खा. हेमंत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष गनाजी बेले, आमदार.संतोष बांगर, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष मानिष आखरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, जावेद राज, उद्धव गायकवाड, डॉ.रमेश शिंदे, परमेश्वर मांडगे, दिलीप बांगर, बाजीराव सवंडकर, सुधाकर मेटकर, परसराम हेंबाडे, परमेश्वर इंगोले आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बोलतांना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांचा मतपत्रिकेत पहिला क्रमांक आहे. मतमोजणी नंतरही ते पहिल्याच क्रमांकावर राहतील  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे शिवसैनिक जीवाचे रान करून सतीश चव्हाण याना निवडून आणतील. अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. चव्हाण यांची काम करण्याची पद्धत आणि सर्वाना सोबत घेऊन चालण्याची कार्यशैली यामुळे ते यंदाच्या निवडणुकीत हॅट्रिक करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपचा समाचार घेताना राज्यमंत्री सत्तार म्हणाले की, भाजप हा जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम करत असून बहुजनांकडे सत्ता जायला नको या मानसिकतेने शंभर  टक्के राजकारण करत आहे. ते आता जनतेच्या लक्षात येत आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या नेत्यांना 'सत्ता मिळणार सत्ता मिळणार' असे गाजर कार्यकर्त्याना दाखवावे लागत आहे. वास्तविक पाहता आता त्यांना पुढील पंचवीस वर्ष सत्ता मिळणारच नसल्याचा दावा राज्यमंत्री सत्तार यांनी केला. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या वर टीका करताना ते म्हणाले की, नितेश राणे म्हणजे चाराने बाकीचे राणे माहित नाही अशा शब्दात त्यांनी खोचक टीका केली आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satish Chavan will score a hat trick of victory, Minister of State Abdul Sattar believes hingoli news