esakal | गणोरीत सत्तारांचा राजीनामा मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

गणोरी (ता. फुलंब्री) : विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात हरिभाऊ बागडे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अंबादास दानवे, अब्दुल समीर यांनी लावलेली हजेरी.

आमदार अब्दुल सत्तार यांनी एकीकडे शिवसेनेत प्रवेश केला, तर दुसरीकडे त्यांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केला आहे.

गणोरीत सत्तारांचा राजीनामा मंजूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री, ता. 2 (जि.औरंगाबाद) ः आमदार अब्दुल सत्तार यांनी एकीकडे शिवसेनेत प्रवेश केला, तर दुसरीकडे त्यांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केला आहे.

गेल्या चार-पाच महिन्यांपासून अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत याबाबत कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क सुरू होते. मात्र, सत्तारांनी गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, सोमवारी गणोरी (ता. फुलंब्री) येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आले होते.

हा कार्यक्रम सुरू असताना नवनिर्वाचित आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, सिल्लोड नगर परिषदेचे उपाध्यक्ष अब्दुल समीर यांनी सकाळी अकराच्या सुमारास कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. हा कार्यक्रम साडेबारापर्यंत चालला. यावेळी अंबादास दानवे, अब्दुल समिर या दोघांचा सत्कारही करण्यात आला. श्री. दानवे यानी भाषण करून हरिभाऊ बागडे यांच्या कामाचे कौतुकही केले. अब्दुल सत्तार यांच्या आमदारकीचे राजीनामापत्र घेऊन हे दोघे आले होते. कार्यक्रम संपल्यावर हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, अब्दुल समीर हे गणोरीतील रवींद्र गायकवाड यांच्या घरी बसले. येथे श्री. बागडे यांनी श्री. सत्तार यांचा राजीनामा मंजूर केला. त्यानंतर उद्धव ठाकरे, हरिभाऊ बागडे यांच्यात मोबाईलवर संभाषणही झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.गणोरीत विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा राजीनामा अब्दुल समीर, अंबादास दानवे विहित नमुन्यात घेऊन आले होते. त्यामुळे राजीनामा स्वीकारला असून मंजूरही करण्यात आला आहे.
- हरिभाऊ बागडे, अध्यक्ष, विधानसभा.

loading image
go to top