परभणी महापालिका क्षेत्रातील शाळांना दहा डिसेंबरपासून सुरुवात

सकाळ वृतसेवा 
Friday, 4 December 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेल्या परभणी महापालिका क्षेत्रातील शाळा आता दहा डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने पालिका क्षेत्रात दहावी व बारावीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश शुक्रवारी (ता.चार) दिले आहेत. 

परभणीः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेल्या महापालिका क्षेत्रातील शाळा आता दहा डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने पालिका क्षेत्रात दहावी व बारावीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश शुक्रवारी (ता.चार) दिले आहेत. इयत्ता नववी व अकरावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने नंतर सुरु होणार आहेत. 

जिल्ह्यातील ३९९ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांपैकी ३२६ शाळांमध्ये हे वर्ग सुरु झाले आहेत. पहिल्याच दिवशी उपस्थितीचे प्रमाण कमी असले तरी पुन्हा ते वाढू लागले आहे. शिक्षणाधिकारी डॉ.वंदना वाहुळ यांनी शाळांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन पालिका क्षेत्रात शाळा सुरु करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता.चार) निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी शाळा सुरु कऱण्याबाबतचे आदेश निर्गमित केले. 

हेही वाचा - लातुरच्या बुधोडा परिसरात हवेत गोळीबार, कारवर दगडफेक करणारा दारुडा ताब्यात

शाळांना घ्यावी लागणार खबरदारी 
महापालिका क्षेत्रातील शाळांनी (ता.दहा) पासून दहावी व बारावीचे वर्ग सुरु करावेत, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के उपस्थित रहाणे बंधनकारक आहे, एखादा शिक्षक बाधित झाल्यास पाच दिवस शाळा बंद करून निर्जंतुकीकरण करावे व पुन्हा शाळा सुरु करावी, हॅन्डवॉश मशीन, थर्मलगन, ऑक्सीमिटर उपलब्ध करणे व पूर्णवेळ कार्यान्वित ठेवणे या आदेशात बंधनकारक केले आहे. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मानवविकास बससेवेकरिता योग्य तो मार्ग नकाशा तयार करून सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

हेही वाचा - घनसावंगी तालुक्यात शेतकऱ्याचा गळफास घेऊन आत्महत्या

सर्व साहित्याची तयारी ठेवावी
शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापकांनी शाळा सुरु होण्यापुर्वी निर्जंतुकीकरणासह सर्व साहित्याची तयारी ठेवावी. विद्यार्थ्यांनी स्वतःचे पाणी सोबत घेऊन यावे, मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतर राखावे व शाळांमध्ये उपस्थित राहून अध्ययन व अध्यापनाच्या प्रक्रियेत उत्साहात सहभागी व्हावे. - डॉ. वंदना वाहुळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी, परभणी. 

ताडकळस पंचक्रोशीत शाळेत विद्यार्थी झाले हजर 
ताडकळस ः नरसिंह विद्यालय, कमलाबाई वडकुते, जिल्हा परिषद शाळा, येथील शाळेची दारे दोन डिसेंबरला उघडताच विद्यार्थी वर्गास दिलासा मिळाला. ताडकळस येथील नरसिंह शाळेत वर्ग दहावा वर्ग बारावा सुरू करण्यात आला. त्यामध्ये पन्नास विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. कमलाबाई वडकुते व जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये दहावी वर्ग सुरु करण्यात आले. या वेळी संचालक विठ्ठलराव वडकुते, मुख्याध्यापक महाजन, शिवाजी गायकवाड, दयानंद स्वामी उपस्थित होते. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी, पालकात समाधान व्यक्त होत आहे. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools in Parbhani Municipal Area start from 10th December, Parbhani News