कृषी विद्यापीठात साकारणार विज्ञान संकुल | Parbhani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी विद्यापीठात साकारणार विज्ञान संकुल

परभणी : कृषी विद्यापीठात साकारणार विज्ञान संकुल

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भव्‍य विज्ञान संकुल उभारण्‍यात येणार असुन याकरिता कृषी विद्यापीठ व परभणी खगोलशास्‍त्र संस्‍था यांच्‍यात रविवारी (ता.२१) सामंजस्‍य करार करण्‍यात आला. सदरिल विज्ञान संकुल उभारणी करिता आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

सदरिल संकुलच्‍या निर्मितीसाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध होणार असुन लवकरच नियोजित विज्ञान संकुल निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्‍यात येणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन आमदार डॉ. राहुल पाटील यांची उपस्थिती होती. डॉ रामेश्‍वर नाईक, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, प्राचार्य डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी करारावर विद्यापीठाच्‍या वतीने शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम आदींनी सहया केल्‍या. तर परभणी खगोलशास्‍त्र संस्‍थेच्‍या वतीने डॉ. रामेश्‍वर नाईक, ओमप्रकाश तलरेजा, सुधीर सोनुनकर आदींनी सहया केल्‍या.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व परभणी खगोलशास्‍त्र संस्‍थाचा यांच्‍यातील सांमजस्‍य करार हा एक ऐतिहासिक क्षण ठरेल. नियोजित विज्ञान संकुल हे विज्ञानातील विविध विद्याशाखेंचा समावेश असलेले आगळेवेगळे दालन तयार करण्‍यात येणार असुन यास भविष्‍यात यास ज्ञान गंगेचे स्‍वरूप प्राप्‍त होईल. नवीन शैक्षणिक धोरणात मुलभुत विज्ञान, उपयोजित विज्ञान व इतर शाखा एकत्रित येऊन बहुविद्याशाखीय शिक्षणाचा समावेश आहे. हे विज्ञान संकुल नवीन शैक्षणिक धोरणाची नांदी असेल.

- डॉ. अशोक ढवण, कुलगुरु, कृषी विद्यापीठ परभणी

परभणी हे शिक्षणाचे व संशोधनाचे माहेरघर निर्माण व्‍हावे, शालेय जीवनातच विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन निर्माण व्‍हावा. तसेच आपल्‍या भागातील विद्यार्थ्‍यांतुन आंतरराष्‍ट्रीय र्कीतीचे शास्‍त्रज्ञ घडावेत हा दृष्‍टीकोन ठेऊन विज्ञान संकुलाचे कार्य हाती घेण्‍यात आले आहे. विद्यापीठात आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे विज्ञान संकुल विकासत होणार असुन याकरिता तीन कोटीचा निधी उपलब्‍ध करून देण्‍यात आला आहे. यामुळे शैक्षणिक पर्यटनास चालना मिळणार आहे. हे विज्ञान संकुल उभारणीचे कार्य एक क्रांतीकारक पाऊल ठरेल.

- डॉ. राहूल पाटील आमदार, परभणी

मराठवाडयातील ग्रामीण विद्यार्थ्‍यांमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय कीर्तीचे शास्‍त्रज्ञ बनन्‍याची क्षमता आहे, त्‍या क्षमतेस वाव देण्‍याची गरज आहे. परभणी खगोलशास्‍त्र संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन विकसीत करण्‍याच्या चळवळीस नियोजित विज्ञान संकुलामुळे गती प्राप्‍त होणार आहे. परभणीतीलच नव्‍हे तर राज्‍यातील विज्ञान प्रेमी करिता नियोजित विज्ञान संकुल दिशादर्शक ठरेल. विद्यार्थ्‍यांना करिअर मार्गदर्शक म्‍हणुन हे संकुल कार्य करेल.

- डॉ. रामेश्वर नाईक, परभणी खगोलशास्‍त्र संस्‍था

loading image
go to top