परभणीतील १८ वॉटर प्लांट्स सील ; अनेकांनी गाशा गुंडाळला 

सकाळ वृतसेवा 
Thursday, 19 November 2020

परभणी महापालिकेच्या पथकाने अनधिकृत मिनरल वॉटर प्लांटचा शोध घेत अठरा प्लांटला सील ठोकले. ही कारवाई गुरुवारी (ता. १९) पथकाने केली.  

परभणी : महापालिकेची पथके शहरातील अनधिकृत मिनरल वॉटर प्लांटचा शोध घेत असून गुरुवारी (ता. १९) या पथकांनी अठरा प्लांटला सील ठोकले तर पथकांची चाहुल लागताच जवळपास सात जणांनी आपले साहित्य लंपास केले. ‘सकाळ’मध्ये अनधिकृत मिनरल वॉटर प्लांटच्या शोधासाठी भरारी पथके हे वृत्त प्रसिद्ध होताच शहरातील अनेक प्लांट धारकांनी आपले वॉटर प्लांट बंद केले होते. 

अन्न व औषध प्रशासनाची परवानगी, पाण्याची गुणवत्ता तपासणी या परवानग्यासह अनेकांनी पालिकेची देखील परवानगी घेतली नसल्याचे दिसून येते. तरीदेखील शेकडोच्या संख्येने शहरात वॉटर प्लांट सुरू होते. पाण्याचा दर्जा काय आहे, याची नागरिकांना देखील पुसटशीही कल्पना नव्हती. 

हेही वाचा -  हिंगोली : सासू अन पतीने पत्नीचे केले औक्षण, जिजाऊ ब्रिगेडचा उपक्रम 

प्रभाग समितीनिहाय भरारी पथके 
मिनरल वॉटर म्हणूनच नागरिक हे पाणी वापरत होते. वर्षानूवर्षापासून या पाण्याचाच बहुतांश नागरिक वापर करत आहेत. प्लांट बंद झाल्यामुळे त्यांना पालिकेच्या नळाच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागली लागत होती. महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या सूचनेवरून उपायुक्त महेश गायकवाड यांनी अनधिकृत वॉटर प्लांट धारकांचा शोध घेण्यासाठी प्रभाग समितीनिहाय भरारी पथके नियुक्त केली होती. या पथकांनी आता कारवाई सुरू केलेली आहे. 

हेही वाचा - यंदाची सप्तपदीही कोरोनाच्या चक्रव्युहात, ३० नोव्हेंबरला पहिला विवाह मुहूर्त

प्रभाग क्रमांक बारा व सोळामध्ये पंधरा अनधिकृत वाटर प्लांट 
प्रभात समिती ‘ब’ अंतर्गत सहायक आयुक्त संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत पुरा यांच्या पथकाने प्रभाग क्रमांक बारा व सोळा मधील एकूण पंधरा अनधिकृत वाटर प्लांटला टाळे ठोकले. या पथकात बील कलेक्टर गंगाधर करे, मुकादम प्रकाश काकडे, विनायक बनसोडे, जोगेंदर कागडा यांचा देखील समावेश होता. प्रभाग समिती ‘अ’ मध्ये सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी परिसरातील तीन वॉटर प्लांटला सील ठोकले. ही पथके दहा प्लांटवर कारवाईसाठी जाणार होती. परंतू, उर्वरित सात जणांना कारवाईची भनक लागताच त्यांनी आपले साहित्य त्या ठिकाणाहून लंपास केल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रभाग समिती ‘क’ मध्ये मात्र कारवाई सुरु झाली की नाही याची माहिती मिळू शकली नाही. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seal 18 water plants in Parbhani; Many rolled up their sleeves, Parbhani News