मराठीतच व्यवहार करु, भाषेला चांगले दिवस येतील

Shivar Sahitya Sammelan Latur
Shivar Sahitya Sammelan Latur

लातूर : ‘‘आपण मराठीतच बोलू. मराठीतच लिहू. मराठीतच जगू. मराठीतच दिसू. मराठीतच सगळा जीवन व्यवहार करू. तरच मराठी भाषेला चांगले दिवस येतील. नाहीतर मराठी भाषा केवळ सामान्य शेतकरी, शेतमजूरांची बोलीभाषा म्हणून जिवंत राहील. मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकली तरच मराठी साहित्य टिकेल. म्हणून मराठी साहित्याचे काय होणार, याचा वेळीच विचार करुन आपण कृती करायला हवी’’, असे मत संमेलनाध्यक्ष फ. म.शहाजिंदे यांनी व्यक्त केले. आपले हित आपण मराठी राहण्यात आहे, पाश्‍चात्य होण्यात नाही, असेही ते म्हणाले.


मराठवाडा साहित्य परिषद, लातूर शाखेच्या वतीने एकुरगा (ता.लातूर) येथे आयोजित एक दिवसीय शिवार साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक डॉ.नागोराव कुंभार यांच्या हस्ते रविवारी (ता.२३) झाले. त्या वेळी शहाजिंदे बोलत होते. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष सूर्यनारायण रणसुभे, साहित्यिक शेषराव मोहिते, स्वागताध्यक्ष निलेश ठक्कर, परिषदेच्या लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ.जयद्रथ जाधव उपस्थित होते. साहित्यक्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन प्रा.सुरेंद्र पाटील, कथाकार विलास सिंदगीकर व डॉ. शाहू रसाळ यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.


श्री.शहाजिंदे म्हणाले, की आजवर अनेक मराठी लेखकांनी मराठी भाषेच्या मृत्यूची चिंता वाहिली. तरीदेखील मराठी भाषेचे बरे झाल्याचे दिसत नाही. या उलट मराठी आणि तेलगू भाषेतून जन्माला आलेल्या दख्खनी भाषेतून विस्तार पावलेल्या हिंदी आणि उर्दू भाषा ज्ञानभाषा होऊ शकल्या. पण, आपली मराठी भाषा ज्ञानभाषा झाली नाही आणि तिला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला नाही. कारण मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रांत मराठी माणसांचे कर्तृत्वच वाढलेले नाही. नुसत्या चिंतेने काहीच होत नसते. आपण आपल्या आत्ममग्नतेतून बाहेर पडून आत्मटीका, आत्मपरीक्षण करायला सुरवात केली, तरच काही कृतीत येण्याची शक्यता आहे. नाहीतर आपण आपलेच हार आपल्याच गळ्यात घालून घेत आनंदी राहू अन् मराठी भाषा सामान्य माणसासारखी संपत-संपत अदृश्य होत जाईल.

वाचा ः आता ‘या’ रुग्णालयात पंचकर्म उपचार माफक दरात
डॉ. कुंभार म्हणाले, की संमेलन मिरवण्याचा भाग न बनता समाजाला मूल्यदृष्टी देत निरोगी, व्यापक व डोळसता निर्माण करणारी असावी. व्यक्ती, समाज संस्कृती यांचे सम्यक वाचन संमेलनातून होत असते. तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान असणारा निर्मोही, निस्वार्थी माणूसच सत्याचा शोध निर्भिडपणे मांडू शकतो. मोहिते म्हणाले, ‘‘वाचन-लेखनाची दीर्घ परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अशा संस्कृतीच्या संवर्धनासाठी शिवार साहित्य संमेलन साह्यभूत ठरतात. संमेलनातून सुसंस्कृत समाजाची घडण होते. साहित्य संमेलन भरविण्यासाठी मनाचा मोठेपणा गरजेचा आहे, असे ठक्कर यांनी सांगितले. डॉ. जाधव म्हणाले, नव्या लिहित्या हातांना बळ देण्यासाठी शिवार साहित्य संमेलनाची उभारणी गरजेची आहे. विवेक सौताडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दुष्यंत कटारे यांनी आभार मानले.

कृषी संस्कृती जगण्याची प्रेरणा देते
शैक्षणिक क्षेत्रातील लातूर पॅटर्नने लातूर जिल्ह्याचे नाव सर्वदूर पोचवले आहे. पण, बाकीच्या जीवन क्षेत्रात कुठे काही चांगले झाले की लगेचच त्याला लातूर पॅटर्न म्हणून आपण स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेतो. ही आपली अल्पसंतोषी वृत्ती पर्यावरणातील असंतुलनाकडे, पाण्याच्या दुर्भिक्ष्याकडे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या शिक्षणाकडे, सर्वसामान्यांना झेपणाऱ्या आरोग्याकडे आणि कला-साहित्य-संस्कृतीच्या पोकळीकडे दुर्लक्ष करीत आहे. लातूरच्या पॅटर्न अभिमान्यांना लेखक-कलावंतानी कांतेच्या भूमिकेतून हळूवारपणे समजावले पाहिजे. कृषीसंस्कृतीचा घट्ट धरलेला हात पुढे जाण्याच्या नादात थोडासा ढिला झालेला आहे. तो पक्केपणाने धरावा लागेल. कारण कृषी संस्कृती ही लाभाविण प्रीती करणारी संस्कृती आहे. कृषी संस्कृती स्वाभीमानाने जगण्याची प्रेरणा देते, असेही शहाजिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com