esakal | ६५ गावांची सुरक्षा ७२ पोलिस कर्मचाऱ्यांच्या हाती

बोलून बातमी शोधा

Police
शहरासह विविध गावात सहा वाहनांद्वारे पोलिसांकडून सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले जात आहे. वारंवार आवाहन करूनही विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र येथील पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर २४ तास खडा पहारा द्यावा लागत आहे.
६५ गावांची सुरक्षा ७२ पोलिस कर्मचाऱ्यांच्या हाती
sakal_logo
By
जगन्नाथ पुरी
सेनगाव (जि. हिंगोली) : येथील पोलिस ठाण्याअंतर्गत ५९ हजार लोकसंख्याचा समावेश असून सुरक्षेसाठी केवळ ७२ पोलिस कर्मचारी आहेत. ५९ हजार लोकसंख्येची सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना पोलिस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर २४ तास खडा पहारा द्यावा लागत आहे.

तालुक्यात १३३ गावाचा समावेश असून सेनगाव पोलिस ठाण्याअंतर्गत ६५ गावांचा समावेश आहे. ६५ गावांतील ५९ हजार एवढी लोकसंख्या आहे. सध्या करोना आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर केले आहे. संचारबंदी लागू होऊनही अनेक नागरिकांकडून कोरोना आजाराबाबत दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा‘मी हिंगोलीकर... स्वयंशिस्त पाळणार, घरातच थांबणार!’ ​

७२ कर्मचारी कार्यरत

येथील पोलिस ठाण्यात एक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दोन, पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या ५२ आहे. संचारबंदी जाहीर होताच इतर ठिकाणाहून सात पोलिस कर्मचारी व दहा होमगार्ड असे एकूण ७२ कर्मचारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अहोरात्र शर्तीचे प्रयत्न करत आहेत. शिवाय येलदरी धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. जीवाचे रान करून येथील पोलिस कर्मचारी, अधिकारी शहरात विविध गावांत पेट्रोलिंग करत आहेत.

सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन

शहरासह विविध गावात सहा वाहनांद्वारे पोलिसांकडून सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले जात आहे. वारंवार आवाहन करूनही विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाकडून दक्षता बाळगली जात असून यंत्रणा अलर्ट झाली आहे. संचारबंदीचे नागरिकांतून पालन केले जावे, त्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिस कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.

पेट्रोलिंगसाठी चार वाहने

मात्र, तब्बल ६५ गावांच्या सुरक्षेसाठी केवळ ७२ कर्मचारी असल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. लॉकडाउन यशस्वीतेसाठी पोलिस कर्मचाऱ्यांच्या संख्येत आणखी वाढ करणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. दरम्यान, पेट्रोलिंग कामासाठी वाहनांची कमतरता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून पेट्रोलिंगसाठी चार वाहने डिझेलसह उपलब्ध करून दिली आहेत. येथील पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.

येथे क्लिक कराहिंगोलीकरांना दिलासा; चौघांचे अहवाल निगेटिव्ह

सुरक्षेसाठी कर्मचारी घेताहेत अहोरात्र मेहनत

पोलिस प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. कमी कर्मचारी असतानीही पेट्रोलिंगद्वारे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. आणखी कर्मचारी संख्या वाढविल्यास लॉकडाउन यशस्‍वी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
-उमेश देशमुख नगरसेवक