esakal | सेनगाव- जिंतुर रोडवर ३३ केव्हीसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन; आमदार मुटकुळेंचा सहभाग
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विविध मागण्यांकरीता सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे ३३ केव्हीसमोर आमदार मुटकुळे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी जिंतुर रोडवर शनिवारी (ता. १३)  दोन तास रास्ता रोको आंदोलन केले आहे.

सेनगाव- जिंतुर रोडवर ३३ केव्हीसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन; आमदार मुटकुळेंचा सहभाग

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : कोटेशन भरुनही कनेक्शन मिळत नाही. बिल भरलेल्या पावत्या मिळत नाहीत. तसेच गावातील विज कापुन त्यांना अंधारात ठेवले जात आहे. अशा विविध मागण्यांकरीता सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे ३३ केव्हीसमोर आमदार मुटकुळे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी जिंतुर रोडवर शनिवारी (ता. १३)  दोन तास रास्ता रोको आंदोलन केले आहे.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी महावितरणचे कर्मचारी विज तोडण्यासाठी आल्यास त्यांना विजेच्या खांबाला बांधून ठेवायला सांगितले. सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील ३३ केव्हीमधून ब्रम्हवाडी व गावठान विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसह विज कनेक्शन तोडण्यावरुन सेनगाव ते जिंतुर या महामार्गावर शेतकऱ्यांकडून महावितरण कंपनीच्या विरोधात तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

तालुक्यातील हत्ता व ब्रम्हवाडी या गावातील शेतकऱ्यांनी कोटेशन भरुनही त्यांना मंजूरी मिळत नाही. विज बिल भरल्यास त्याच्या सुध्दा दिल्या जात नाहीत. अनेक गावातील नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रारी देऊनही विज पुरवठा सुरळीत केला जात नाही. वरुन विज कनेक्शन तोडून अनेक गावांना अंधारात ठेवले जात आहे. असा आरोप करीत सर्व शेतकऱ्यांनी आमदार मुटकुळे यांच्या उपस्थितीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तुम्हाला जर शासनाने दिलेली कामे होत नसतील तर तुम्ही तुमच्या बदल्या करुन तोंड काळे करा आम्ही दूसरे अधिकारी बोलावून घेऊ असे उपस्थित आंदोलकांनी ठणकावून सांगितले. तसेच हत्ता परिसरात अधिकृत लाईनमन दिलेला नाही. त्यामुळे काम करण्यास ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. 

याकडे महावितरणने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. हत्ता येथील ३३ केव्हीवरुन ब्रम्हवाडी फिडरवर विद्युत पुरवठा करण्यास अतिशय कमी वेळ दिला जात आहे. ठराविक वेळेत खाजगी व्यक्तीना परमिट दिल्यामुळे लाईन बंद केली जाते. ऑपरेटर चूकीची वर्तणुक देतात. शेतकऱ्यांना अरेरावी करतात. अशोक ठोके हा कंत्राटी कामगार त्यांच्या मर्जीप्रमाणे लाईन चालू आणि बंद करतो. तर काही ठिकाणी सिंगल फेजवर लाईन होते. कोळसा येथील ३२ केव्हीचे ट्रांसफार्मर लवकरात लवकर सुरु करण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, राष्ट्रवादीचे रवि गडदे, ब्रम्हवाडीचे सरपंच, हत्ता येथील सरपंच व शेकडो शेतकरी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील, पोलिस उपनिरीक्षक अभयकुमार माकने, पोलिस रमेश कोरडे, श्री. पूरी, श्री. बांगर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी उप अभियंता श्री. लोखंडे यांनी सांगितले की, ब्रम्हवाडी कोटेशन भरलेले कनेक्शन आठ दिवसात देण्यात येईल. विज बिल भरलेल्या पावत्या सुध्दा लवकर देण्यात येतील. वरिष्ठाशी बोलून लाईनमनचा प्रश्न लवकरच मिटवला जाईल.

संपादन- प्रल्हाद कांबळे