ज्येष्ठांनो सावधान ...!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

- परभणीत भामट्यांनी गंडविले दोन वृध्द महिलांना
- ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
-साडी मिळवून देतो म्हणून केली बतावणी 

 

परभणी ः शहरातील शनिवार बाजार परिसरात असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ अज्ञात भामट्यांनी दोन वृध्द महिलांना फसवत ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात नानलपेठ पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.सात) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील फरजाना बेगम (वय ६५, रा.धाररोड) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी (ता. सात) दुपारच्या सुमारास भिक्कुलाल पेट्रोलपंपाजवळ एक व्यक्ती त्यांच्या जवळ आला. आमच्या सेठला मुलगा झाला आहे. त्या निमित्त ते गरीबांना साड्या वाटप करत आहेत असे सांगितले. तुम्हाला साडी मिळवून देतो मात्र, तुम्ही गरीब दिसत नाहीत, असे म्हणत गळ्यातील सोन्या, चांदीचे दागिने आणि सात हजार रुपये नगदी काढून ठेवण्यास सांगितले. हातचालाखीने भामट्याने सदर पिशवी घेऊन पोबारा केला. 

दुसरी घटना देखील याच परिसरात घडली. भुई गल्लीतील ६० वर्षीय रहिवाशी खुर्शीद बेगम यांना देखील भामट्यांनी अशीच बतावणी करत त्यांच्या अंगावरील ३९ हजार रुपये किंमतीचे सोन्या, चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला. या घटणेमुळे अज्ञातांविरोधात शनिवारी सायंकाळी उशीरा नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही प्रकरणाचा तपास पोलिस हेड काँन्सटेबल कादरी करत आहेत.

सावध राहण्याची गरज ः
सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी एखादी महिला रस्त्याने पायी जात असते. तिच्या मागील किंवा पुढील बाजूने एक दुचाकी येते. या वेळी दुचाकीवर बसलेल्या दोघांचा कुणाला संशयी येत नाही. महिलेच्या जवळ येताच दुचाकीचा वेग कमी होतो अन् काही कळायच्या आत दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचते. दुचाकीचा वेग वाढतो व कुणाला काही समजण्यापूर्वीच दुचाकीवरील चोरटे तेथून पसार होतात. शहराच्या विविध भागात सध्या असे प्रकार सुरू झाले असून, रोजच विविध भागात सोनसाखळी चोरीचे गुन्हे नोंदविले जात आहेत.

त्याबाबत नागरिकांकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा परिणाम म्हणून पोलिसांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. सोनसाखळी चोरीच्या घटना घडणाऱ्या भागामध्ये सकाळी व संध्याकाळी गस्त वाढविण्यात आली होती. त्याचप्रमाणे संशयित दुचाकीस्वारांना अडवून त्यांची चौकशीही केली जात होती. काही भागात साध्या वेशातील पोलिस महिलेकडून नकली दागिने घालून रस्त्यावर सापळाही लावण्यात येत होता. आता या मागण्या परभणीत घडलेल्या घटनेने समोर येत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seniors Be careful!