Hingoli1
Hingoli1

गंभीर प्रकरण, पोलिस उपनिरीक्षकाची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना चुकीची वागणुक

हिंगोली ः येथील निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना चुकीची वागणुक देणाऱ्या उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी राजपत्रित अधिकारी महासंघाने सोमवारी (ता.१५) कामबंद आंदोलन सुरु केले. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला. कळमनुरी, औंढा नागनाथ येथे महसूल कर्मचाऱ्यांचे तहसील कार्यालयाकडे निवेदन दिले. 

येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री.सुर्यवंशी यांचे वाहन अडवून त्यांना चुकीची वागणून देण्यात आली. उपनिरीक्षक साईनाथ अलमोड यांनी प्रकरण मिटले असतानाही सोशल मिडीयावर काही बाबी व्हायरल केल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी हे अतिरिक्त दंडाधिकारी असतांनाही त्यांना उपनिरीक्षक अनमोड यांनी दिलेली वागणुक चुकीची असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. यात महासंघाचे सचिव रामदास पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे, प्रविण फुलारी, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद पोहरे, आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, गणेश वाघ, नितीन दाताळ, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, गजानन शिंदे, ज्योती पवार, पांडूरंग माचेवाड, जीवककुमार कांबळे, कर्मचारी संघटनेचे तत्तापुरे, गोपाल कंठे, विनोद ठाकरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी नियोजन विभागाच्या सभागृहात एकत्र येऊन कामबंद आंदोलन सुरु केले.

विविध संघटनेचा पाठिंबा
या आंदोलनास तलाठी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, पालिका कर्मचारी संघटना, कृषी संघटना यासह इतर संघटनांनी पाठिंबा देत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे जिल्हाभरात पोलिस विभाग वगळता सर्वच विभागांचे कामकाज ठप्प झाले होते. पोलिस विभागाने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास अत्यावश्‍यक सेवा वगळून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. या वेळी अनेकांनी मनोगत व्यक्‍त केले. तसेच पोलिस अधिक्षक यांच्याकडे या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनावर अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी शंकर बरगे, उपजिल्‍हाधिकारी रोहयो अनुराधा ढालकरी, गोविंद रणवीरकर, डॉ. देवीदास हिवाळे, डॉ.शिवाजी पवार, निलेश कानवडे, संदीप सोनटक्‍के, गणेश शिंदे, ए. एल. बोंद्रे, एस. एन. पाटील, शैलेश फडसे, अशोक साबळे, प्रवीणकुमार घुले, सी. डी. वाघमारे आदींच्या स्‍वाक्षऱ्या आहेत. तसेच तलाठी संघाचे सरचिटणीस विनायक किन्होळकर, मराठवाडा अध्यक्ष सय्यद आयुब, जिल्‍हाध्यक्ष विनोद ठाकरे, कार्याध्यक्ष गजानन रणखांब यांनीदेखील जिल्‍हाधिकारी यांच्याकडे या संदर्भात निवेदन दिले. 

औंढा नागनाथ येथे महसूल कर्मचाऱ्यांचे निवेदन 
औंढा नागनाथ ः हिंगोलीचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी हे शासनाच्या नियमाचे शहरात पालन होते किंवा नाही हे पाहण्यासाठी खाजगी वाहनाने जात असताना पोलिस निरीक्षक श्री. अनमोड यांनी वाहन अडवूण अरेरावीची भाषा वापरली तसेच वरिष्ठ पोलिसांना कळवून देखील गाडी पोलिस ठाण्यात लावण्यास सांगितले तसेच त्‍यांना अपमानास्‍पद वागणूक दिल्याने पोलिस उपनिरीक्षक श्री.अनमोड यांनी दिलेली खोटी तक्रार निकाली काढून त्‍यांना निलंबित करावे, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघ यांना महसूल कर्मचाऱ्यांनी पाठींबा दिला असून ते कामबंद आंदोलनात सहभागी झाले. या बाबतचे निवेदन तहसीलदार पांडूरंग माचेवाड यांना एन. एन. कुलकर्णी, एन. एस. घोणे, के. एन. पलटणकर, डी. के. जाधव, ई. बी. सय्यद, व्ही. एन. गिरी यांनी दिले.  

कळमनुरीत महसूल कर्मचारी संघटनेतर्फे कामबंद
कळमनुरी ः हिंगोली येथील राजपत्रित अधिकाऱ्यावर पोलिसाकडून दाखल करण्यात आलेली तक्रार मागे घेऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेतर्फे कामबंद आंदोलन करून याबाबत निवेदन देण्यात आले. तहसील कार्यालयाचे सर्वच अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कार्यालयात कुठलेही कामकाज होऊ शकले नाही. हिंगोली अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेल्या चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याविरोधात पोलिस उपनिरीक्षक श्री.अनमोड यांनी दिलेली तक्रार मागे घेऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी राजपत्रित अधिकारी- महासंघाकडून पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांना दिले. या वेळी कर्मचारी संघटनेचे बी. जी. रेड्डी, एस. आर. कदम, राजू लांडगे, मोहम्मद खालेख, एस. आर. फाळेगावकर, अजिंक्य पंडित, पी. बी. राठोड, संतोष बांगर, यू. एस. मारकड, सय्यद अन्वर, प्रवीण सुरोशे, दिगंबर संगेकर, ए. जी. चव्हाण, पि. के. रिठे, दिलीप एंगडे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या वेळी राजपत्रित अधिकारी विरोधात दाखल झालेली तक्रार मागे न घेतल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com