esakal | गंभीर रुग्णांना सरकारी कोविड सेंटरमध्येही ऑक्सिजन बेड नाही
sakal

बोलून बातमी शोधा

covid ward

गंभीर रुग्णांना सरकारी कोविड सेंटरमध्येही ऑक्सिजन बेड नाही

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने बाधितांची संख्या वाढतच आहेत. अनेक गंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. मात्र सामान्य कुटुंबातील गंभीर रुग्णांना सरकारी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाहीत. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात शंभर बेडसाठी ऑक्सिजन पुरवठ्याची यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. अतिदक्षता विभागात २१ तर वार्डातील ३८ रुग्णांना सध्यस्थितीत ऑक्सिजन देण्यात येत आहे.

उमरगा शहरात उमरगा, लोहारा तालुक्यासह शेजारील असलेल्या निलंगा तालुक्यासह कर्नाटक राज्यातील कोरोना बाधित उपचारासाठी येताहेत. उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर, सहा खाजगी कोविड सेंटरमध्ये रुग्णावर उपचार केले जाताहेत. बाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाचीही धावपळ होत आहे. दररोज सरासरी साठ ते सत्तर रुग्ण आढळून येत आहेत.

सामान्य कुटुंबातील रुग्णांना सरकारी कोविडचा आधार महत्वाचा ठरतो आहे पण तेथे ऑक्सिजन बेडसाठी प्रतिक्षा करावी लागते आहे. चार - पाच दिवसानंतर ऑक्सिजन लेवल व्यवस्थित असताना, सध्या त्यांना ऑक्सिजन सुरू नसतानाही असे रूग्ण बेड सोडायला तयार नाहीत. डॉक्टरांनी डिस्चार्चचा दिला तरी ते भितीमुळे गादी सोडायला तयार नाहीत त्यामुळे इतर रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. दरम्यान सहा खाजगी कोविड सेंटरमध्येही ऑक्सिजन बेडसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.

लोकप्रतिनिधींनी थोडं सरकारी कोविडची पाहणी करावी-

सामान्य कुटुंबातील रुग्णांचे होणारे हाल पहावत नाहीत. लोकप्रतिनिधींनी पंखाच्या हवेखाली आढावा घेण्यापेक्षा उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या अडचणी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची विचारपुस करायला जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या लोकप्रतिधींनी यायला हवे. खासगी कोविड सेंटरचीही पाहणी करावी पण सरकारी यंत्रणा कशी आहे, याचे अनुभवकथन ऐकण्यासाठी लोकप्रतिनिधींची भेट महत्वाची आहे त्यातुन अनेक प्रश्नांची उकल होऊ शकते. उपजिल्हा रुग्णालय प्रमुखांनी अतिदक्षता विभाग असो की, वार्डातील बेड असोत तेथे किती वेळा पाहणी केली आहे ? हा खरा प्रश्न आहे. अतिदक्षता विभागात रुग्णांचा तडफडून मृत्यु झाला तर त्या वेळी डॉक्टर असतात का ? असा प्रश्नही नातेवाईकांतुन व्यक्त केला जातोय. दरम्यान आरोग्य यंत्रणा कामाच्या तणावात काम करतेय. पण लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात समन्वय व अचूक माहितीची देवाणघेवाण झाली तर अनेकांना जीवदान मिळू शकेल.

रुग्णांची बेफिकीरी वाढली !

उपजिल्हा रुग्णालयात दररोज रॅपिड अन्टीजेन चाचण्या होताहेत. गृह विलगीकरणात रुग्ण अधिक आहेत, ते घरातच असतात की, त्यांची बेफिकीरी वाढली याची तपासणी गांभिर्याने केली जात नाही. कांही रुग्ण खासगी रुग्णालयासाठी रेफर पत्र घेतात. उपचारानंतर ते किती दिवसाने बाहेर पडतात याची माहिती घेणे आवश्यक आहे. शहरातील एका तरुणाचा पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह अहवाल आला, दुसऱ्या दिवशीच्या चाचणीत तो निगेटिव्ह आला. तो आता फिरतोय. यातील दोष रुग्णा बरोबरच सरकारी यंत्रणेचाही आहे. उपजिल्हा रुग्णालयात सध्या गोंधळाची स्थिती आहे ती समन्वयातून दूर होणे गरजेचे आहे. नागरिकांनीही सरकारी यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे.

loading image
go to top