Video पाहा : लातुरात बुक डेपोला भीषण आग, साडेतीन तासानंतर आग आटोक्यात

Torch Book Depot, Latur
Torch Book Depot, Latur


लातूर : शहरातील उद्योग भवन परिसरातील संकल्प बुक डेपोला गुरुवारी (ता.२३) पहाटे भीषण आग लागली. या आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक आले. आगीचे लोट पाचव्या मजल्यापर्यंत पसरले होते. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. पुस्तक दिनादिवशीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. उद्योग भवन भागात सहा मजली इमारत आहे. या इमारतीत काही घरे आणि काही दुकाने आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर संकल्प बुक डेपो आहे. या दुकानात शॉक सर्किटमुळे रात्री दीड वाजता आग लागली. पण, दोन वाजेनंतर दुकानातील काचा फुटण्याचा आवाज आला. स्फोटासारखा आवाज ऐकून या इमारतीतील नागरिकांनी खाली येऊन पाहिल्यानंतर त्यांना दुकानाच्या शटरमधून धुराचे प्रचंड लोट बाहेर येत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशामक दलाला माहिती दिली.

अग्निशामक दलाचे प्रमुख जफर शेख यांनी तत्परता दाखवत अवघ्या काही मिनिटांत अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी पाठवले. भीषण आग लागल्याचे समजताच महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनीही घटनास्थळी धाव घेतली. शटर तोडून अग्निशामक दलाने आग विझवायला सुरवात केली. जवळपास साडेतीन ते चार तासांनंतर आग आटोक्यात आल्याचे सांगण्यात आले. या आगीत किती रुपयांचे नुकसान झाले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

वाचा ः गाव सांभाळा, मी तुमच्यासोबत आहे ; सरपंच, पदाधिकाऱ्यांशी पालकमंत्र्यांनी साधला...

तापमान वाढल्याने लातूरकर घामाघूम
 गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस होत असला तरी सध्या शहरातील तापमानाचा आलेख चांगलाच वाढला असल्याचे दिसून आहे. शहरातील तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. गुरुवारपासून (ता.२३) तीन दिवस तो ४० अंश सेल्सिअसवर असणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, चाकूर, अहमदपूर तालुक्यांत बुधवारी तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर पोचला आहे.जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत गेले काही दिवस दररोज अवकाळी पाऊस कोसळत आहे. पावसाबरोबरच काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे घराघरातील पंखे, कूलर दिवसभर सुरू ठेवावे लागत आहेत. जे नागरिक अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडत आहेत, त्यांना तळपत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, रुमाल, छत्रीचा आधार घ्यावा लागत असल्याचेही दिसून आले.


कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने दुपारी दोनपर्यंतच किराणा दुकाने, भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील, असे सांगितले असले तरी बहुतांश नागरिक वाढत्या उन्हामुळे सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेतच खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. टाळेबंदीमुळे बहुतांश नागरिक दिवसभर घरात बसून आहेत. पावसाळ्याच्या कामानिमित्ताने अधूनमधून वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिक घरात बसून घामाघूम होत आहेत. वाढत्या उन्हामुळे कलिंगड, द्राक्षे, खरबूज, संत्री, मोसंबी, आंबे या फळांना सध्या बाजारात मागणी आहे. ग्राहकांचा हा प्रतिसाद टाळेबंदीमुळे मागील वर्षाच्या तुलनेने खूपच कमी आहे, असेही विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com