मुरूडच्या ग्रामीण रुग्णालयातील सातजणांचे अहवाल निगेटिव्ह

विकास गाढवे
शुक्रवार, 22 मे 2020

बोरगाव काळे (ता. लातूर) येथे मुंबई येथून सासरवाडीत आलेल्या कुटुंबातील माहेरवाशीण मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.२२) सकाळी कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयातील सातजणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मुरूडकरांचा जीव भांड्यात पडला आहे.

लातूर : बोरगाव काळे (ता. लातूर) येथे मुंबई येथून सासरवाडीत आलेल्या कुटुंबातील माहेरवाशीण मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.२२) सकाळी कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयातील सातजणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मुरूडकरांचा जीव भांड्यात पडला आहे. दरम्यान, याच कुटुंबांतील १६ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बोरगावच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन झाली आहे. दरम्यान, शनिवारी (ता.२३) कुटुंबांच्या संपर्कात आलेल्या आणखी सातजणांचे स्वॅब घेतले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बोरगाव येथे रविवारी (ता.१७) सकाळी मुंबईहून कारने सासरवाडीत आलेल्या जावयाला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्याची सुरवातीला मुरूडच्या ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर निवळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. तेथून लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जावई व त्याच्यासोबत गेलेल्या पत्नीचीही तपासणी करून दोघांचे स्वॅब घेण्यात आले होते. यात लक्षणे असलेल्या जावयाचा अहवाल निगेटिव्ह तर त्याच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानिमित्ताने तालुक्यात पहिल्यांदा बोरगाव येथून कोरोनाचा शिरकाव झाला. मंगळवारी (ता.१९) बोरगावमधील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आला.

कोरोनाबाधिताच्या संपर्कातील २३ जण क्वारंटाइन, सरपंचांना घरात अलगीकरण

त्यानंतर मुंबईहून आलेल्या कुटुंबांतील १६ वर्षीय मुलाचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे बुधवारी (ता.२१) रात्री उघड झाले. यामुळे एकाच कुटुंबांतील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने बोरगावकरांच्या चिंतेत भर पडली. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंबई येथून आलेल्या कुटुंबांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच क्वारंटाइन करण्यात आले होते. मुरूडच्या ग्रामीण रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी, तीन इंटर्न, एक परिचारिका व दोन वॉर्डबॉय अशा सातजणांना क्वारंटाइन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी सातही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मुरूडकरांचा जीव भांड्यात पडला आहे.

आज सातजणांचे स्वॅब घेणार
दरम्यान, कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या सासूबाई व मुंबईच्या कुटुंबातील उर्वरित दोन मुलांचेही स्वॅब शुक्रवारी घेण्यात येणार आहेत. यासोबत कुटुंबाच्या बोरगाव येथील घरी विजेची दुरुस्ती करणारा इलेक्ट्रिशियन, मुंबईच्या कुटुंबातील हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारणारे निवळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन कर्मचारी तसेच जावई व त्याच्या पत्नीला लातूरला घेऊन गेलेला चालक, अशा सातजणांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. शनिवारी (ता.२३) हे अहवाल येण्याची शक्यता आहे. या अहवालांची बोरगाव व परिसरातील ग्रामस्थांना उत्सुकता आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven Corona Reports Negative, Latur