Ambajogai : शिलाई कामावर आईने मुलांच्या शिक्षणाला दिले पाठबळ

धर्मापुरीतील पांचाळ दांपत्याचा संघर्षमय प्रवास
sewing machine work mother contribution to her child education
sewing machine work mother contribution to her child educationSakal

अंबाजोगाई : कुटुंबातील पारंपरिक सुतारकीच्या व्यवसायाची सवय नव्हती, सासरे किराणा दुकान चालवायचे ते बंद झाले. मग स्वत: शिलाईचे प्रशिक्षण घेऊन घरातच व्यवसाय सुरू केला. यावरच मुलांच्या शिक्षणाला त्या आईने बळ दिले.

धर्मापुरी (ता.परळी) येथील रेणुका ईश्वर पांचाळ यांच्या जिद्दीची व कष्टाची ही सत्यता आहे. त्यांचे पती खासगी वाहनावर चालकाचा व्यवसाय करून संसारात हातभार लावतात. यांचा मोठा मुलगा शिवहार वैद्यकीयच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्यांचा दुसरा मुलगा युवराज हा नीटच्या परीक्षेची तयारी करीत आहे.

रेणुकाताई पांचाळ यांची दहावी निघाली नाही. मात्र अजूनही राहिलेला दहावीचा एक विषय काढण्याची तयारी त्यांनी आता ठेवली आहे. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. पती खासगी वाहनावर बदली चालक म्हणून काम करतात.

मात्र तेवढ्यात उदरनिर्वाह भागत नसल्याने रेणुकाताई यांनी स्वत: शिलाईचे प्रशिक्षण घेऊन घरीच हा शिलाईचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा हा व्यवसाय चांगला चालू लागला, त्यावरच मुलाचे शिक्षण होऊ लागले. मोठा मुलगा शिवहार हा हुशार निघाला.

अभ्यासाबाबत त्याला घरचे काहीच मार्गदर्शन नसताना त्याने धर्मापुरीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत, सहावीला गढी (ता.गेवराई) येथील नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला. १२ पर्यंतचे शिक्षण त्याने तिथेच घेतले. विज्ञान शाखेत त्याने ९२ टक्के गुण घेतले.

परिस्थितीअभावी शिवहार नीटच्या खासगी शिकवणीची फीस भरू शकत नव्हता. त्यामुळे त्याने गावी राहूनच मोबाइलवर फिजिक्सवालाचे ऑनलाइन क्लास केले. या अभ्यासक्रमावरच त्याने नीटमध्ये ५८६ गुण मिळविले.

या गुणवत्तेवर त्याने धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय (एमबीबीएस) शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र या शिक्षणासाठी फीस भरणे त्याला शक्य नव्हते, तेव्हा त्याच्या आईने शिलाईच्या व्यवसायातून कमावलेल्या पैशातून त्याची फीस भरली. प्रवेशाच्या फीसची व्यवस्था तर झाली परंतु शिवहारच्या दररोजच्या जेवणाचा प्रश्न होता. मेससाठी लागणारे पैसे कुठून आणायचे, हा प्रश्न होता.

यावेळी अचानक आधार माणुसकीच्या माध्यमातून ॲड. संतोष पवार यांनी ठाणे येथील विद्यार्थी सहाय योजनेतून शिवहारच्या मेसची वैद्यकीय शिक्षण पूर्ण होईपर्यंतची सोय केली. या माध्यमातून त्याला दरमहा तीन हजार रुपये मिळतात. त्यामुळे या मदतीनेही मुलाच्या शिक्षणास मोठा हातभार लावला. काही प्रमाणात बचत गटांचाही त्यांना आधार झाला.

माझी आई खूप जिद्दी आहे. तिने आम्हा भावंडांना शिक्षणासाठी कधी कमी पडू दिले नाही. मातृशक्ती काय असते हे माझ्या आईकडे पाहून शिकले पाहिजे. कोविडमध्ये लॉकडाउन असल्याने वडिलांचे काम बंद होते, तेव्हा घरात आईने मोठा हातभार लावला. आई-वडिलांच्या पाठबळ व आधार माणुसकीचा आधार यावर माझे वैद्यकीयचे शिक्षण होऊ शकते.

- शिवहार पांचाळ

संसारात काटकसर करून एकवेळ स्वतःकडे दुर्लक्ष केले; पण मुलांच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. माझ्या मुलाने मोठा डॉक्टर झाल्यावर अशाच अडचणीत सापडलेल्या मुलांना किंवा लोकांना मदत करण्याची तयारी ठेवावी हीच मनोमन इच्छा आहे.

- रेणुकाताई पांचाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com