Vidhan Sabha 2019 : लातूरच्या हक्काचे पाणी आमदारांनी चोरले : शैलेश लाहोटी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 October 2019

लातूरचा दुष्काळ मानवनिर्मित

लातूर - साखर कारखान्याच्या माध्यमातून लातूरच्या हक्काचे पाणी स्थानिक आमदारांनी चोरले आहे. लातूरचा दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. त्याला स्थानिक आमदारच कारणीभूत आहेत. पर्यटन म्हणून लातूरला येणाऱ्या आमदारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी टीका भाजपचे उमदेवार शैलेश लाहोटी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार, आमदार अमित देशमुख
यांच्यावर केली. 

लातूर शहर मतदारसंघात नारायणनगर भागात झालेल्या प्रचारसभेत लाहोटी बोलत होते. माजी खासदार किरीट सोमय्या, स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती, ऍड. शैलेश गोजमगुंडे, अजित पाटील कव्हेकर, नगरसेवक संगीत रंदाळे, वर्षा कुलकर्णी आदी उपस्थित होते. लातूरच्या हक्काचे पाणी साखर कारखान्याला घेण्यात आले. आमदारांनी हे पाणी एकप्रकारे चोरले आहे. त्यामुळे लातूरचा दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. विकास करणाऱ्यांच्या मागे उभे राहायचे, की सातत्याने लातूरला दुष्काळाच्या खाईत लोटणाऱ्याच्या मागे उभे राहायचे, हे ठरविण्याची वेळ आली आहे. पर्यटन म्हणून लातूरला येणाऱ्या आमदारांना मतदान करणार का, असा प्रश्नही लाहोटी यांनी केला. 

लातूरला कधी बंगळुरू, तर कधी शांघाय करू, अशा घोषणा कॉंग्रेसवाल्यांनी केल्या. बंगळुरू, शांघाय तर सोडाच; पण दुष्काळी म्हणून लातूरची ओळख स्थानिक आमदारांनी करून दिली आहे. स्थानिक आमदारांना विधानसभेत कधी बोललेले पाहिले आहे का? आज भाजपमुळे येथे रेल्वे बोगीचा कारखाना सुरू होत आहे. हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिमळणार आहेत. लातूरच्या विकासासाठी मला एकदा संधी द्यावी, असे आवाहन लाहोटी यांनी केले.  राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळातील सिंचनातील गैरव्यवहाराचे प्रकरण थांबलेले नाही. त्याची चौकशी होणारच आहे. राहुल गांधी जेथे जेथे प्रचाराला जातात तेथे तेथे भाजपचा विजय निश्‍चित आहे. लातूर जिल्ह्यातही ते आले होते. त्यामुळे येथेही भाजपचा विजय निश्‍चित आहे, असे सोमय्या म्हणाले. 
  
मुंबईचे पार्सल परत पाठवा 
लातूरचे आमदार हे मुंबईला राहतात. लातूरकरांनी त्यांना सातत्याने संधी दिली; पण ते साधे पाणी देऊ शकले नाहीत. मुंबईचे हे पार्सल परत मुंबईला पाठवा. लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. लाहोटी यांना विजयी करा, लातूरला 365 दिवस पाणीपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही सोमय्या यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shailesh Lahoti criticizes MLA Amit Deshmukh