‘या’ जिल्ह्यात कांद्याने गाठली शंभरी !

कैलास चव्हाण
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

- आवक घटल्याने भाव गगनाला भिडले; हॉटेल, खानावळीतून हद्दपार
- परभणीला औरंगाबाद, नगर जिल्ह्यातून येतो कांदा 
- सरासरी दररोज ८०० ते १००० क्विंटल कांद्याची आवक सध्या २०० क्विंटलवर आली 

 

परभणी : जिल्ह्यात कांद्याची आवक घटल्याने भाव गगनाला भिडले आहेत. ८० ते १०० रुपये किलो या प्रमाणे विक्री होत आहे. त्यामुळे आहारातून कांदा गायब झाला आहे. हॉटेल, खानावळी यामधून देखील कांद्याला हद्दपार करण्यात आले आहे.

मागील काही दिवसापासून उन्हाळ कांदा महाग झाला आहे. परभणीला औरंगाबाद, नगर जिल्ह्यातून कांदा येतो. परंतु सध्या त्याच जिल्ह्यात कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे परभणीला येणारी आवक कमालीची घटली आहे. परभणीला सरासरी दररोज ८०० ते १००० क्विंटल कांद्याची आवक होते. सध्या ही आवक २०० क्विंटलवर आली आहे. कांद्याचे कोठार असलेल्या नाशिक आणि नगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची टंचाई झाल्याने लासगाव आणि पिंपळगाव बसवंत या मुख्य बाजारात कांदा ठोक मध्येच भाव '१०० रुपयाच्या पुढे गेल्याने त्या भागातून अन्य भागात होणारी निर्यात मदांवली आहे. मराठवाड्यात जो कांदा येतो त्यालाही जागेवरच ५० रुपयाच्यापेक्षा अधिक भाव मिळत आहे. त्यामुळो किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये कांदा मिळत आहे.

परभणीच्या पाथरी रस्त्यावरील भाजी मार्केटमध्ये मंगळवारी (ता.तीन) केवळ २०० क्विंटल कांद्याची अवक झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातून कांदा तुरळक ठिकाणीच उपलब्ध होता. स्थानीक शेतकऱ्यांकडील कांदा संपला आहे. त्यामुळे बाहेरच्या कांद्यावर अवलंबुन राहावे लागत आहे. कांदा महाग झाल्याने स्वंयपाकातून कांदा गायब झाला आहे. तसेच खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल, खानावळीतून कांदा दिसेनासा झाला आहे. एरवी दहा ते २० रुपये किलोने मिळणारा कांदा दोन महिण्यापासून थेट ८० रुपयावर गेल्याने बाजारातदेखील कांद्याची विक्री घटली आहे. एक किलो ऐवजी पाव किलो कांदा खरेदी करण्यावर ग्राहक भर देत आहेत. अनेक समारंभातून देखील कांदा नाहीसा झाला आहे.

नवीन कांद्याची प्रतीक्षा
सध्या बाजारात येत असलेल्या उन्हाळ कांदा आता संपत आला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे नवीन कांदा लागवडीस महिनाभराचा उशिरा झाला आहे.'अनेकांनी हस्त नक्षत्रात कांदा रोप टाकले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे निघालेले रोप करपुन गेल्याने आता नव्याने रोप टाकावे लागले आहे. तसेच पावसामुळे जमिनी खराब झाल्याने त्या दुरुस्त करण्यात वेळ गेला. नवीन रोप आल्यावर आता कुठे कांद्याची लागवड सुरु झाली आहे. त्यामुळे अजुन किमान दोन ते अडिच महिने तरी नविन कांदा बाजारात येण्यास लागणार आहेत.

 

स्थानीक शेतकऱ्यांचादेखील कांदा बंद
सध्या बाहेर येणारी कांद्याची आवक मंदावली आहे. तसेच स्थानीक शेतकऱ्यांचादेखील कांदा बंद झाला आहे. त्यामुळे ठोक बाजारात कांदा वधारला आहे. परभणीत ठोक बाजारात कांदा ४० ते ५० रुपये किलो प्रमाणे जात आहे. त्याचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारात कांदा महाग झाला आहे.

शेख मुसा, सचिव भाजीपाला मार्केट असोसिएशन
.....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shambhari reaches onion in 'this' district!