सरकारच्या चुकीच्या धोरणाने तरुण पिढी, शेतकरी अस्वस्थ : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

बीड जिल्ह्यात मुक्कामी असलेल्या शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. 18) राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यात पवार बोलत होते.

बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा कार्यक्रम राबविला नाही. तसेच उद्योग बंद पडत असल्याने बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे राज्यात तरुण पिढी व शेतकरी अस्वस्थ असल्याचे आपण पाहत आहोत. याला सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याची टिका जेष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. 

बीड जिल्ह्यात मुक्कामी असलेल्या शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. 18) राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यात पवार बोलत होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, महिला आघाडीच्या रुपाली चाकणकर, युवक आघाडीचे महेबुब शेख, डॉक्टर आघाडीचे डॉ. नरेंद्र काळे उपस्थित होते. पवार म्हणाले, राज्यात यंदा 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. घामाने पिकविलेल्या मालाची किंमत भेटत नाही त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने शेतकरी हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे शरद पवार म्हणाले. आपण केंद्रात मंत्री असताना 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. या सरकारने दिलेल्या कर्जमाफीत ऑनलाईमुळे केवळ 40 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून 60 टक्के शेतकऱ्यांच्या डोक्यावर अद्यापही कर्जाचा बोजा असल्याचे शरद पवार म्हणाले. 

सत्तेच्या काळात शिक्षण संस्था, कारखाने काढून तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिले. परंतु, आताच्या धोरणामुळे कारखाने व उद्योग बंद पडत आहेत. मुंबईत कधीकाळी 120 कापड गिरण्यांत चार लाख लोक काम करत. यातील 116 गिरण्या बंद पडल्या असून केवळ चार सुरु असल्याचेही शरद पवार म्हणाले. परवा नाशिकमध्ये असताना कामगार आपल्याला भेटले. 42 उद्योग बंद पडल्याचे सांगून 16 हजार लोकांचे रोजगार गेल्याचे त्यांनी आपल्याला सांगीते असेही शरद पवार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar criticizes BJP government on the topic of farmers and youth