त्याला विमानात भेटले शरद पवार आणि सुटली गावाची समस्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

सामान्य शेतकरी कुटुंबातील सारंगला हे क्षण फार मोलाचे वाटले. त्याने फेसबुक लाईव्ह आणि फोटोद्वारे ते सोशल मीडियावर शेअर केले. शरद पवार यांची ही भेट आपल्यासाठी अविस्मरणीय अनुभव असल्याचे तो म्हणाला.

परभणी : दिल्लीहून पुण्याला येण्यासाठी निघालेल्या तरुणाला विमानात खुद्द शरद पवार दिसले. त्यांच्या सोबत एक फोटो तरी घ्यावा म्हणून तो सरसावला, तर पवारच त्याच्या शेजारी येऊन बसले. आणि मग त्या तरुणाचा दिल्ली ते पुणे विमानप्रवास असा झाला, की त्याच्या मनात ती एक जन्मभराची सोनेरी आठवण कोरली गेली.

एव्हढंच नव्हे, तर या तरुणाने शरद पवार यांच्याशी बोलताना आपल्या गावातली एक समस्या त्यांच्या कानावर घातली. पवारांनीही विशेष लक्ष घालून ती समस्या सोडवण्याचे आश्वासन त्याला दिले.

हा तरुण होता परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मैराळ सांगवी या गावाचा. सारंग जाधव त्याचं नाव. या मतदारसंघाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या सोबत तो दिल्लीला गेला होता. हा त्याचा पहिलाच विमान प्रवास होता. आणि या प्रवासात त्याला सोबत लाभली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची.

सामान्य शेतकरी कुटुंबातील सारंगला हे क्षण फार मोलाचे वाटले. त्याने फेसबुक लाईव्ह आणि फोटोद्वारे ते सोशल मीडियावर शेअर केले. शरद पवार यांची ही भेट आपल्यासाठी अविस्मरणीय अनुभव असल्याचे तो म्हणाला.

पवारांसमोर मांडली गावाची समस्या

शरद पवार यांच्या सोबत प्रवास करण्याची अवचित संधी सारंगला शुक्रवारी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचा प्रश्न त्याने पवारांच्या कानावर घातला. त्याच वेळी खासदार जाधव यांनीही हा प्रश्न लालफितीत अडकल्याचे सांगितले. यावेळी शरद पवार यांनी तात्काळ यावर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांना दिले.

ते म्हणाले, शेतीकडे लक्ष द्या

या प्रवासात शरद पवार यांनी सारंगशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याचं शिक्षण, कुटुंबाची स्थिती याबद्दल आपुलकीने विचारपूस केली. नोकरीसोबतच शेतीकडेही लक्ष देण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच, जळगावकडून केळीचे दर्जेदार वाण आणून आपल्या शेतात लावण्याचेही सुचवले. आपणही स्वतः 10 एकरात शेती करतो, असे त्यांनी सारंगला सांगितले.

सारंगचा हा पहिलाच विमानप्रवास असल्याचे कळल्यावर त्यांनी विमानाच्या खिडकीतून सारंगला खाली दिसणाऱ्या एकेका भागाची माहितीही दिली. विमानातून दिसणारे पुणे, मगरपट्टा सिटीही त्यांनी दाखवली. सारंगचा हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar met him on a plane