लाईक, शेअर, फॉरवर्ड पडू शकते महागात 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 22 सप्टेंबर 2019

सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी सायबर विभागात विशेष पथक नैतान 
 

बीड - सध्या सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह असणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. सध्या आचारसंहितेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर पोलिस प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. यामुळे खोट्या बातम्या, बदनामीकारक मेसेज करताना मोबाईलधारकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. पोलिस दलाने सायबर विभागात सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. यामुळे युवकांसह इतरांना सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा लागणार आहे. 

सध्या जिल्ह्यात विधानसभांचे वारे सुरू झाले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने तयारी करताना दिसत आहेत. निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने विशेष तयारी केली आहे. मोबाईच्या माध्यमातून एखादी माहिती सहज दुसऱ्या ठिकाणी पोच केली जाते. याचा फायदा घेत काही गुन्हेगारी वृत्तीचे चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर फॉरवर्ड करत असतात. याच बातम्या खऱ्या समजून अनेक जण लाईक शेअर, फॉरवर्ड करतात. एका खोट्या बातमीमुळे शांतता भंग होऊ शकते. यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना युवकांना खात्री करून फॉरवर्ड करावी लागणार आहे. 

तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद 
सध्या प्रत्येकाच्या हाती मोबाईल असल्यामुळे एखादी माहिती सहज मिळू शकते; परंतु एखाद्या बातमीची खात्री न करता ती पुढे पाठविल्यास गुन्हा नोंद होऊ शकते. कलम 505 नुसार गुन्हा नोंद झाल्यास तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. 
 

सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी सायबर विभागात विशेष पथके तैनात करण्यात आलेली आहेत. जे कुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा किंवा इतर बाबींतून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कलम 505 नुसार कारवाई करण्यात येईल. 
- हर्ष पोद्दार, पोलिस अधीक्षक, बीड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Like, share, forward can be expensive