तिला जायचं होतं भावाच्या लग्नाला, पण बसमध्ये...

file photo
file photo

नांदेड : भावाच्या लग्नाला जाण्यासाठी निघालेल्या एका महिलेची सव्वालाख रुपयाचे दागिणे असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शुक्रवारी (ता. २८) सकाळी अकराच्या सुमारास लातूर फाटा येथे किनवट ते अहमदपूर बसमध्ये चढतांना घडली. 

एसटी महामंडळाच्या बसमध्ये चढतानाचा प्रकार 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सिडको येथील वर्षा शिवशरण बागे (वय ३३) मुळ राहणाऱ्या बाळकुम रोड, ठाणे यांच्या भावाचे लग्न असल्याने त्या ठाणे येते जाण्यासाठी निघाल्या. त्यांनी प्रवासात अंगावर दागिणे नको म्हणून आपल्या पर्समध्ये ठेवले. त्या सिडको येथून शुक्रवारी (ता. २८) सकाळी लातूर फाटा येथे आल्या. अहमदपूरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमध्ये बसत असतांना त्यांच्या पर्समध्ये असलेली वरील रक्कमेच्या दागिण्याची पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार त्यांना विष्णुपूरी येथे गेल्यानंतर लक्षात आला. त्यांनी आपल्या पर्समधील छोटी पर्स पाहिली असता ती दिसली नाही. 

अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

त्यांनी लगेच विष्णुपूरी येथे बसमधून खाली उतरल्या. परत लातूर फाटा येथे जावून पर्स कुठे खाली पडली का याची शहानिशा केली. परंतु त्यांची पर्स अज्ञातानी लांबविल्याचे त्यांच्या लक्षात आले. घडलेला प्रकार त्यांनी आपल्या घरच्या मंडळीना सांगितला. घरच्यांनीही त्यांना धीर देत नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. वर्षा बागे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्री. गवळी करत आहेत. 

मुंबई बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान

नांदेड : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता. २९) नांदेडला मतदान झाले. औरंगाबाद विभागातून दोन संचालक निवडण्यासाठी जिल्ह्यातील १८ बाजार समितीच्या १६१ संचालकांपैकी १५८ संचालकांनी (९८ टक्के) मतदानाचा हक्क बजावला.

आशिया खंडातील सर्वात मोठी उलाढाल असलेल्या मुंबइ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक निवडीसाठी शनिवारी (ता. २९) राज्यात मतदान झाले. मुंबई बाजार समितीवर राज्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागातून दोन संचालक निवडले जातात. औरंगाबाद विभागाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप उमेदवारात चुरस होती. यात अकरा उमेदवार निवडणूक मैदानात होते.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदान

यात काँग्रेसचे वैजनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अशोक डक, भाजपकडून प्रशांत पाटील व राधाकिशन पठाडे यांचा समावेश आहे. इतर उमेदवारांत चंद्रकांत जाधव, प्रल्हाद धनगुडे, अशोक पाटील, राजेश पाटील, भागीनाथ मगर, निकिता शिंदे यांचा समावेश होता. सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदान झाले. यात जिल्ह्यातील १८ बाजार समितीच्या १६१ संचालकांपैकी १५८ संचालकांनी मतदान केले. निवडणुकी दरम्यान, निरीक्षक अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी निवडणुकीचे काम पाहिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com