
Anandwadi Protest
Sakal
शेंदूरवादा : छत्रपती संभाजीनगर जिल्हा गंगापूर तालुक्यातील आनंदवाडी ते जुने कोडापूर या दोन किलोमीटर रस्त्याच्या मागणीसाठी आनंदवाडी येथील ग्रामस्थांनी आज गुरुवारी (ता. १६) सकाळी नऊ वाजता जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली. अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी प्रलंबित असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासनांची खैरात वाटली गेली आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांचा संयम अखेर संपुष्टात आला आणि त्यांनी पाण्यात उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. तब्बल अकरा तास चाललेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.