उद्योजकावर प्राणघातक हल्ला

चौसाळ्यात कार्यकर्त्याकडूनच कृत्य : व्यापाऱ्यांनी पाळला बंद
जीवघेणा हल्ला
जीवघेणा हल्लाSakal

बीड - शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते आणि आघाडीचे उद्योजक नितीन लोढा (वय ३२) यांच्यावर गावातीलच तरुणाने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी (ता. सहा) रात्री उशिरा चौसाळा येथे घडली. हल्लेखोर हा त्यांचाच एकेकाळचा कार्यकर्ता आहे. हल्ल्यात नितीन लोढा यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. सात) चौसाळात व्यापाऱ्यांनी बंद पाळला.

पोलिसांच्या माहितीनुसार, नितीन लोढा हे सोमवारी एक लग्नसमारंभ उरकून रात्री घरी परतले. रात्री साडेदहा वाजता गावातीलच एका तरुणाने फोन करून भेटायची इच्छा व्यक्त केली. श्री. लोढा यांनी सकाळी भेटू असे सांगितल्यावर मी घराकडे येत आहे, तात्काळ भेटायचे आहे, असे त्याने सांगितले. त्याला भेटण्यासाठी नितीन लोढा हे घराबाहेर येताच दुचाकीवरून आलेल्या युवकाने हातातील सत्तूराने त्यांच्यावर वार केला. यात लोढा यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्याला गंभीर जखम झाली. नितीन लोढा यांनी आरडाओरड केल्यावर हल्लेखोर तेथेच दुचाकी सोडून चौसाळ्यातील बाह्यवळण रस्त्याने पळून गेला.

परिसरातील तरुणांनी त्यास पकडून चोप दिला. नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख, उपनिरीक्षक अजय पानपाटील व सहकाऱ्यांनी या हल्लेखोरास ताब्यात घेतले. हल्ल्यात वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे. जखमी लोढा यांना सुरुवातीला बीडच्या खासगी दवाखान्यात दाखल केले. नंतर उशिरा औरंगाबादला हलविले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपनिरीक्षक अजय पानपाटील हे जबाब नोंदविण्यासाठी औरंगाबादला रवाना झाले आहेत. गुन्हा नोंदवून पुढील कारवाई केली जाईल, असे सहायक निरीक्षक शेख मुस्तफा यांनी सांगितले.

दरम्यान, हल्लेखोर तरुण हा एकेकाळचा नितीन लोढा यांचाच कार्यकर्ता आहे. तो सध्या बीडमध्ये एका हॉटेलात काम करतो. लोढा यांनी दुर्लक्ष केले, अपमानास्पद वागणूक दिली यामुळे हल्ला केल्याचा खुलासा त्याने चौकशीत केला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी केज येथे कार्यालयात घुसून नायब तहसीलदार महिलेवर भावानेच शस्त्राने हल्ला केल्याची घटना ताजी असताना पुन्हा अशी घटना घडली.

हल्ल्याच्या निषेध

नितीन लोढा हे या परिसरातील राजकारणातील आणि उद्योगातील बडे प्रस्थ आहे. परिसरातीलच पारगाव (जि. उस्मानाबाद) येथील भीमाशंकर शुगर्स कारखान्याने ते चेअरमन असून त्यांच्या पत्नी चौसाळ्याच्या माजी सरपंच आहेत. मागच्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसंग्राम मधून शिवसेनेत प्रवेश केला. हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी मंगळवारी स्वयंस्फूर्तीने व्यापारपेठ बंद ठेवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com