Vidhan sabha 2019 : एकमेकांच्या मतदारसंघात शिवसेना-भाजपची बंडखोरी

प्रकाश बनकर
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

'मध्य'मध्ये 2014 ची पुनरावृत्ती? 
वर्ष 2014 मध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. यात जैस्वाल-तनवाणी यांच्यातील लढतीत दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला होता. आता ही जागा शिवसेनेला सुटली आणि पुन्हा माजी खासदार जैस्वाल यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे पुन्हा तनवाणी यांनी पक्षाच्या विरोधात जात उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे औरंगाबाद मध्य मतदारसंघात 2014 ची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. 

औरंगाबाद : राज्यात शिवसेना-भाजप युती झाली; मात्र अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी बंडखोरीची वाट धरली आहे. औरंगाबादेत शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्याने आणि भाजपच्या मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यातर्फे बंडाचे निशाण हाती घेण्यात आले. "पूर्व'मधून राज्यमंत्री अतुल सावे यांच्या मतदारसंघातून शिवसेनेच्या राजू वैद्य यांनी, "मध्य'मधून प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आणि पश्‍चिममधून संजय शिरसाट यांच्याविरोधात भाजपच्या राजू शिंदे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

विधानसभा निवडणुकीत युती होणार नसल्याचे गृहीत धरून भाजप आणि शिवसेनेतर्फे अनेकांनी स्वतंत्रपणे तयारी केली होती. युतीची घोषणा झाल्यामुळे पाच वर्षांपासून केलेली मेहनत वाया गेली. यामुळे काही इच्छुकांना पक्षांनी शांत केले; तर काहींनी पक्षाविरोधात जात उमेदवारी अर्ज दाखल केला. बंडखोरीची पहिली ठिणगी वैजापुरातून पडली. वैजापूरची जागा शिवसेनेची असल्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आणि भाजपच्या नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांचे पती डॉ. दिनेश परदेशी यांनी पक्षाचा आदेश झिडकारत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सिल्लोडची भाजपची जागा शिवसेनेला गेली. तेथील इच्छुक व प्रदेश कार्यकारिणीतील सदस्य सुरेश बनकर आणि सुनील मिरकर यांनी बंडखोरी करीत शुक्रवारी (ता. चार) अर्ज दाखल केला. तसेच कन्नडमधून बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार व राजू राठोड, संजय गव्हाणे यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केला आहे. 

पक्षाच्या आदेशानेच निर्णय घेतल्याचा दावा 

शहरातून राज्यमंत्री अतुल सावे हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीचे सुरवातीला स्वागत करणाऱ्या शिवसेनेने पूर्व विधानसभा मतदारसंघाचे संघटक राजू वैद्य यांनी अचानकपणे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या आदेशानेच हा निर्णय घेतला असल्याचा दावा वैद्य यांनी केला. 

'मध्य'मध्ये 2014 ची पुनरावृत्ती? 
वर्ष 2014 मध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. यात जैस्वाल-तनवाणी यांच्यातील लढतीत दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला होता. आता ही जागा शिवसेनेला सुटली आणि पुन्हा माजी खासदार जैस्वाल यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे पुन्हा तनवाणी यांनी पक्षाच्या विरोधात जात उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे औरंगाबाद मध्य मतदारसंघात 2014 ची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. 

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही बंड 
औरंगाबाद पश्‍चिम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. विद्यमान आमदार संजय शिरसाट दोन टर्मपासून आमदार आहेत. यावेळी शिवसेनेने त्यांच्यावर विश्‍वास दाखवत उमेदवारी दिली. याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी पक्षाचा आदेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केला. कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे शिंदे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena-BJP revolt in each other's constituency