शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थलांतरास लागले आठ तास

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 July 2019

स्ट्रक्‍चरल ऑडिट होणार 
छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ धातूचा पुतळा ३३ वर्षांपूर्वी क्रांती चौकात बसविण्यात आला होता. या काळात पुतळ्याची झीज झाली का? आणखी किती वर्षे पुतळा टिकू शकतो? यासाठी स्ट्रक्‍चरल ऑडिट शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत केले जाणार आहे. सुधारणा, अत्यावश्‍यक कामे बलराज मडिलगेकर करणार आहेत.

औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. आठ) रात्री पुतळा स्थलांतराचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल आठ तासांनंतर तारेवरची कसरत करीत तीन टन वजनाचा हा पुतळा मंगळवारी (ता. नऊ) सकाळी ८.३० वाजता चिकलठाणा येथील मडिलगेकर आर्ट स्टुडिओमध्ये सुरक्षितरीत्या नेण्यात आला.

क्रांती चौकात उड्डाणपूल झाल्यापासून पुतळा झाकोळला गेला. त्यामुळे पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी शिवप्रेमी वारंवार करीत होते. महापालिकेने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, शिवप्रेमींनी महापालिकेत धडक घेत पदाधिकारी, प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर गेल्यावर्षी शिवजयंतीला कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही, म्हणून पुन्हा एकदा आंदोलन केल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. एक कोटी ८४ लाख रुपये खर्च करून पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढविणे, सुशोभीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी पुतळा सुरक्षितस्थळी स्थलांतरित करणे गरजेचे होते. सोमवारी रात्री सव्वाबारा वाजता पुतळा काढण्यासाठी काम सुरू करण्यात आले. पहाटे साडेचारला पुतळा मोकळा झाला. क्रेनच्या साह्याने पुतळा ट्रकमध्ये ठेवल्यानंतर चिकलठाणा एमआयडीसीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. गरवारे कंपनीजवळ हायटेन्शन तारांचा अडथळा आल्यामुळे ट्रक थांबविण्यात आला.

गरवारे कंपनीच्या व्यवस्थापनाला महापौर नंदकुमार घोडेले यांनी विनंती केल्यानंतर कंपनीच्या गेटमधून पुतळा एमआयडीसीतील मडिलगेकर आर्ट स्टुडिओ येथे पोचला. मात्र, तोपर्यंत सकाळचे साडेआठ वाजले होते. महापौर, सभागृह नेते विकास जैन, विनोद पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुतळा स्थलांतरित करण्यासाठी रात्र जागून काढली.

सहा महिन्यांची मुदत
महापालिकेने पैशांची हमी दिली तरच काम करू, असा पवित्रा कंत्राटदाराने घेतला होता. काम करण्यास विलंब केला जात असल्यामुळे महापालिकेने कंत्राटदाराला नोटीसही बजावली होती. त्यानंतर महापालिकेने कंत्राटदाराकडून हमीपत्रही घेतले. काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Maharaj Statue Migration for Height Increase