शेतकरी कुटुंबातील शिवनंदा बनली उपनिरीक्षक

लालसिंग रानडे
बुधवार, 15 जानेवारी 2020


नायगाव तालुक्यातील केदारवडगावच्या मुलीने पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला असून त्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आहे.

गडगा, (ता.नायगाव, जि.नांदेड)ः प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेऊन जिद्दीने आणि मेहनतीने पुढे आलेल्या शिवनंदा हिने नायगाव तालुक्यातील केदारवडगाव येथून पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला. त्यामुळे सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.

तिने २०१७ च्या राज्यसेवेत यश संपादन केले असून नुकताच तिचा दीक्षांत समारंभही झाला आहे. काही दिवसांपूर्वी शिवनंदा जाधव ही ठाणे जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाली आहे. नायगाव तालुक्यातील केदारवडागाव येथील शेतकरी प्रल्हादराव इंद्राजीराव जाधव यांनी मुलांच्या शिक्षणाबरोबरच लेकीच्या शिक्षणलाही प्राधान्य दिले. लहानपणापासून ग्रामीण भागातील राहिलेली शेतकरीच कुटुंबातून संस्काराचे बाळकडू मिळालेली शिवनंदा आज मोठ्या दिमाखात पोलिस प्रशासनात अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. 

हेही वाचा-  नांदेडमध्ये स्वीकृत सदस्यांचा मुहूर्त कधी
शिवनंदाचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. गावात स्पर्धा परीक्षा सोडा; उच्च शिक्षण घेण्यासाठीही कुठली सुविधा उपलब्ध नाही. मात्र, मानातील आणि भाऊ, आई, वडिलांकडून मिळालेल्या साथीमुळे शिवनंदाने डी. एड. केले. परंतु, शासनाच्या उदासीनतामुळे हजारो डीएडधारक आज शिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीला दोष न देता शिवनंदा हिने जिद्दीने मुक्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण करून परीक्षेची पूर्वतयारी केली व यश मिळविले.

घरातील संस्कार, विचारांचेच फळ 
प्रल्हाद इंद्राजीराव जाधव हे शेतकरी कुटुंबातील असेल तरी सामाजिक प्रश्नांवार पुढाकार घेऊन कार्य करणारे आणि पुरोगामी विचार व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांनी तीनही मुलींना शिक्षण दिले, त्यापैकी दोघांचा विवाह झाला. तर शिवनंदा हिने डीएडनंतर नांदेडात भावाकडे राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करून यश आपल्या पदारात पाडून घेतले. मुलगा- मुलगी असा भेदभाव न करणे, या घरातील संस्कारी विचारांमुळे आमच्या घरातील मुलींना वडिलांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, असे शिवनंदाचे भाऊ तथा महात्मा फुले शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

 

मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभात नातेवाइकांसह माझा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व मराठा सेवा संघाकडून सत्कार केला गेला. ग्रामीण भागातील मुलींमध्ये गुणवत्ता आहे, ती सिद्ध करण्यासाठी पालकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. माझ्या यशाचे श्रेय मला सहकार्य करणारे माझे आई, वडील, भाऊ व बहीण यांना जाते.
- शिवंनदा जाधव, पोलिस उपनिरीक्षक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivananda became sub-inspector of the farmer family