नोकरीच्या प्रतीक्षेत खेळाडूंचा झाला "फुटबॉल'!

file photo
file photo

औरंगाबाद : राज्यातील सर्वात मानाचा असा "शिवछत्रपती पुरस्कार' पटकावलेल्या खेळांडूना सांगली, पुण्यातील महापालिकांनी नोकऱ्या दिल्या. औरंगाबाद महापालिकेने या खेळाडूंना नोकरी देण्याचा प्रस्ताव पारित केल्यानंतरही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तांत्रिक मेखींचा भरणा असलेल्या या प्रस्तावाने सागर मगरे, नेहा ढेपे, दिनेश वंजारे या शिवछत्रपती पुरस्कारार्थींचा "फुटबॉल'च केला आहे. 


शिवछत्रपती पुरस्कारार्थी खेळाडूंना महापालिकेच्या सेवेत घेण्याच्या प्रस्तावाला पुणे, सांगली महापालिकेने मंजुरी देत रोजगाराची संधी दिली. औरंगाबाद महापालिकेनेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून 11 डिसेंबर 2018 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव एकमुखाने मंजूर केला. या मंजूर प्रस्तावाला अनुसरून खेळाडूंनी दाखल केलेल्या अर्जाला नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आले. राज्य सरकारकडून या प्रस्तावात काही त्रुटी काढल्या होत्या. बदल करून पुन्हा प्रस्ताव पाठवण्यासाठी या तीन खेळाडूंच्या फायली परत महापालिकेत आल्या. मात्र, या फायली परत गेल्याच नाहीत. सर्वसाधारण सभेचा निर्णय असताना औरंगाबाद महापालिकेच्या प्रशासनाने हा प्रस्ताव परत पाठवलाच नाही. हा प्रस्ताव आता कधी पाठविणार, याबाबात आम्हाला उत्तर मिळत नसल्याची प्रतिक्रिया या खेळाडूंनी व्यक्त केली. 

खेळासाठी घाम गाळून उपयोग काय? 
शिवछत्रपती पुरस्कारापर्यंत पोचण्यासाठी शालेय आयुष्यापासून घाम गाळावा लागतो. अनेक स्पर्धांमध्ये कस लागतो. सुवर्णपदकांना गवसणी घालण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांचे चीज या पुरस्कारातून होते. मात्र, पुरस्कार विजेत्यांच्या पदरी निराशा येणार असेल तर होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन कसे मिळणार, असा सवाल या नोकरीसाठी अर्ज करणारे खेळाडू सागर मगरे यांनी उपस्थित केला. 
 

"खेळाडूंच्या प्रस्तावात त्रुटी आल्याने त्यांचा प्रस्ताव माघारी आला होता. खेळाडूंचा हा प्रस्ताव दुरुस्त करून तो लवकर पाठवण्यासाठीचे पत्र आयुक्तांना दिले आहे. खेळाडूंना झालेल्या या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.'' 
- नंदकुमार घोडेले, महापौर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com