
वीस गुंठ्यात चार लाखांचे उत्पन्न
गल्लेबोरगाव : शिवना टाकळी येथील प्रगतशील शेतकऱ्याने जिद्द, कठोर मेहनत आणि कोटेकोरपणे केलेल्या उत्तम व्यवस्थापनामुळे चक्क शेडनेटमध्ये वीस गुंठ्यात चार लाखांच्या शिमला मिरचीचे उत्पन्न घेऊन किमया साधली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकरी आज प्रचंड वाढलेल्या महागाईने हैरान झाला आहे. त्यातच पिकांना म्हणावा असा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस शेतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, याला येथील शेतकरी वैभव बाबासाहेब आहेर हे अपवाद असून त्यांनी शेडनेटमध्ये वीस गुंठ्यात चार लाखांच्या शिमला मिरचीचे उत्पन्न घेऊन इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
या शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून (पोकरा) वीस गुंठ्यात शेडनेट उभारले. यानंतर यामध्ये जानेवारीमध्ये शिमला मिरचीची लागवड केली. त्यांना आतापर्यंत ८ ते ९ टन उत्पादन मिळाले. आता पुन्हा त्यांना ७ ते ८ टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. शिमला मिरचीला जवळपास २५ ते ३० रुपये प्रति किलो जागेवर दर मिळाला आहे. या शिमला मिरचीपासून त्यांना जवळपास साडे चार ते पाच लाख रुपये मिळणार आहे. या शेडनेटसाठी साडे आठ लाख रुपये अनुदान मिळाले असून प्रथम शिमला मिरची लागवडीसाठी छत्तीस हजार रुपये अनुदान मिळाले आहे.
विशेष म्हणजे वैभव आहेर यांनी या योजनेत स्वाभिमानी शेतकरी गटाची स्थापना केली असून या गटा मार्फत विविध योजना राबविण्याचा मानस वैभव आहेर यांनी केला आहे. यासाठी त्यांना सिल्लोड येथील उपविभागीय कृषी अधिकारी श्री.चव्हाण, कन्नड तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, कृषी सहाय्यक श्री. देसले आदींसह कृषी विभाग व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
Web Title: Shivna Takli Farmer Capsicum Income Four Lakhs In Twenty Guntas
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..