Vidhan Sabha 2019 : मातोश्रीचा आदेश शिरसावंद्य; औरंगाबाद पूर्वमधून शिवसेनेची माघार

डॉ. माधव सावरगावे
Monday, 7 October 2019

औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडे आहे. या मतदारसंघात भाजपचे अतुल सावे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रेणुकादास उर्फ राजू वैद्य यांनी आपला अर्ज दाखल केला होता.

औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रेणुकादास ऊर्फ राजू वैद्य यांनी माघार घेतली. 'मातोश्रीचा आदेश शिरसावंद्य आहे' म्हणून ही माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 

औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडे आहे. या मतदारसंघात भाजपचे अतुल सावे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रेणुकादास उर्फ राजू वैद्य यांनी आपला अर्ज दाखल केला होता. सलग तीन दिवस वैद्य यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी स्वतः अतुल सावे आणि भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. त्या प्रयत्नाला आज यश आले. आज दुपारी औरंगाबाद पूर्व विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यलयात जाऊन रेणुकादास ऊर्फ राजू वैद्य यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

पद महत्त्वाचे नसून लोकांची सेवा, कामे महत्त्वाची आहेत. मातोश्रीचा आदेश शिरसावंद्य आहे, म्हणून मी उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना विक्रमी मते कशी मिळतील, यासाठी मी प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena candidate withdraw nomination in aurangabad