धक्कादायक : नांदेडमध्ये कोरोना बाधीत पहिला रुग्ण

शिवचरण वावळे
Wednesday, 22 April 2020

पीरबुऱ्हाणनगर येथील एका ६५ वर्षीय नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे इतके दिवस ग्रीन झोनमध्ये असलेला नांदेड जिल्हा एकदमच आॅरेंज झोनमध्ये गेल्याने नांदेडकरांसह जिल्हा प्रसाशन हादरले आहे

नांदेड : २१ दिवसांचे पहिले लॉकडाउन सुरळी पार पाडल्यानंतर बुधवारी (ता. २२ एप्रिल २०२०) कोरोना विषाणु बाधीत रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीरबुऱ्हाणनगर येथील एका ६५ वर्षीय नागरीकाला याची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर, महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुदेशसिंह बिसेन यांनी दिली. 

कोरोनाचा कहर सुरु झाल्यानंतर त्यापासून नांदेड जिल्हा दुर होता. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे नांदेड जिल्हा आता तरी सेफ झोनमध्ये होता. परंतु, अचानकच बुधवारी एका ६५ वर्षीय नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, नांदेड  शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

शेजारील सर्व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असताना नांदेड जिल्हयात मात्र एकही रुग्ण सापडला नव्हता. मंगळवारी (ता.२१ एप्रिल २०२०) पाठवलेल्या नऊ नमुन्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दिली. दरम्या जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळीच सर्व यंत्रणांची तातडीची बैठक सुरु असून, पीरबुऱ्हाणनगर सील करण्याची कारवाई सुरु झाली आहे.

मंगळवारी दिवसभरात मराठवाडा विभागात दहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनामुक्त झालेल्या हिंगोली जिल्ह्यात काल एकाच दिवशी सहा राज्य राखीव दलाचे जवान पॉझिटिव्ह आले. त्यांना मालेगाव येथे बंदोबस्त करून आल्यानंतर ही लागण झाल्याचे समजते. मराठवाड्यात नांदेड जिल्हा सुरुवातीपासून खऱ्या अर्थाने कोरोनामुक्त होता. मात्र, बुधवारी सकाळी पीरबुऱ्हाण नगरातील हा रुग्ण कोरोना बाधित झाल्याने नांदेडमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: First patient with coronary obstruction in Nanded