esakal | धक्कादायक : जिल्हा शासकीय रुग्णालयच सील करण्याची वेळ येण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील एका विभागात काम करणाऱ्या एका परिचारिकेस कोरोना विषाणुची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य यंत्रणा हादरली आहे. सर्वात धोकादायक म्हणजे या परिचारिकेने सलग तीन दिवस रुग्णालयात कर्तव्य देखील बजावले होते.

धक्कादायक : जिल्हा शासकीय रुग्णालयच सील करण्याची वेळ येण्याची शक्यता

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील एका विभागात काम करणाऱ्या एका परिचारिकेस कोरोना विषाणुची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य यंत्रणा हादरली आहे. सर्वात धोकादायक म्हणजे या परिचारिकेने सलग तीन दिवस रुग्णालयात कर्तव्य देखील बजावले होते. त्यामुळे  ही परिचारिका अन्य किती जणांच्या संपर्कात आल्या असतील या विचारानेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराकडे जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र, गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात जनरल वार्डमध्ये कार्यरत एका परिचारीकेचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांनी पीपीई किटसह दर्जेदार मास्क, सॅनिटायझर  देण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाने धुडकवल्याची माहिती आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. एक पोलिस कर्मचारी कोरोना बाधीत झाल्यानंतर पोलिस ठाणे सील करण्यात आले. परंतु, येथे कार्यरत परिचारीका बाधीत झाल्यानंतरही कुठल्याही प्रतिबंधात्मक उपोययोजना राबविल्या जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात जनरल, आयसीयु विभागात कार्यरत असलेल्या एका परिचारीकेस कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरील परिचारीका सावंगी भांबळे (ता.जिंतूर) येथील कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात आल्याचे बोलले जाते.

हेही वाचा : कोरोना ब्रेकिंग : परभणीत दिवसभरात वाढले तब्बल ३१ पॉझिटिव्ह  

स्वॅब घेण्यास ही दिला नकार ?
विशेष म्हणजे सदरील परिचारिकेने स्वतःहून स्वॅब घेण्याची विनंती केली होती. पण स्वॅब घेण्यास देखील टाळाटाळ करण्यात येत असल्याचे समजते. स्वॅब घेतल्यानंतर त्या परिचारिकेस विलगीकरण कक्षात देखील ठेवले नव्हते. अहवाल येईपर्यंत ही परिचारीका सेवेत होती. त्यामुळे ती अनेक रुग्णांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कात देखील आल्याचे बोलले जाते. परंतु याकडे देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णालयातच संसर्ग पसरण्याचा धोका वाढला आहे.

अन्यथा रुग्णालयच करावे लागणार सील
येथील जिल्हा सामान्य रुग्णालाय प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस झाला असून हीच परिस्थिती कायम राहिली तर परभणीचे जिल्हा शासकीय रुग्णालय देखील बंद करण्याची वेळ येणार असल्याची भिती व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होणार आहे.

हेही वाचा : प्रज्ञासूर्याची ऊर्जाशक्ती : रमाई

राजीनामा देण्याचा जिल्हा शल्यचिकित्सकाकडून सल्ला
मंगळवारी (ता.२७) कोरोना कक्ष वगळता उर्वरीत विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे पीपीई किटसह दर्जेदार एन ९५ मास्क, सॅनिटायझर देण्याची मागणी केली आहे.
परंतु त्यांना झिडकारण्यात आल्याची माहिती असून नोकरी करायची नसल्यास राजीनामा द्यावा, असा सल्ला देखील वरीष्ठाकडून दिल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या अन्य विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

एकाच रुग्णवाहिकेवर सर्व प्रकारचे रुग्ण वाहण्याची वेळ
जिल्हा शासकीय रुग्णालयात एकच रुग्णवाहिका असून त्याद्वारेच कोरोना संशयीत रुग्ण घेऊन येण्याचे, मृत झालेले बाधीत रुग्ण घेऊन जाण्याचे काम केल्या जाते. रक्तदान शिबिरांसह अन्य गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी देखील त्याच रुग्णवाहिकेचा वापर केला. त्यामुळे देखील कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर 
गंगाखेड व परभणी शासकीय रुग्णालयातील ज्या परिचारिका कोरोना पॉझिटीव्ह सापडल्या आहेत. त्या ज्या भागात वास्तव्य करत होत्या तो भाग आम्ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
- स्वाती सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी, परभणी
 

loading image
go to top