परभणीतील धक्कादायक प्रकार, शिक्षकांचे स्वॅब तिसऱ्या दिवशीही केंद्रातच पडून 

सकाळ वृतसेवा 
Tuesday, 24 November 2020

परभणी शहरातील सीटी क्लब येथील संकलन केंद्रावर स्वॅबचे बॉक्स मागील दोन ते तीन दिवसांपासून पडून आहेत. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  

परभणी ः एकीकडे रांगा लावून शिक्षक-कर्मचारी आरटीपीसीआर टेस्टसाठी स्वॅब देत आहेत तर त्याच्या अहवालासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात खेट्या मारीत आहे. तर दुसरीकडे मात्र त्यांचे घेतलेले स्वॅब कोरोना चाचणीसाठी न पाठवता दोन-दोन दिवस संकलीत केंद्रावरच पडून राहत असल्याची धक्कादायक बाब समोर येत असून सीटी क्लब येथील केंद्रावर (ता.२१) नोव्हेंबरपासूनच विविध केंद्रातून संकलीत केलेले स्वॅब मंगळवारी (ता.२४) देखील पडून होते. 

शासनाने शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केल्या आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील विविध संकलन केंद्रावर हजारो शिक्षक रांगा लावून टेस्टसाठी आपले स्वॅब देत आहेत. स्वॅब दिल्यानंतर आपला चाचणी अहवाल काय येतो, याची मनात भीती घेऊन ते रिपोर्टच्या प्रतिक्षेत गेल्या काही दिवसांपासून संकलन केंद्रे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरोग्य विभाग व शासकीय रुग्णालयात खेटे मारीत आहेत. आपल्या अतिशय आतुरतेने वाट पाहणाऱ्या या शिक्षकांना तीन-चार दिवसानंतरही आपला चाचणी अवहाल मिळत नाहीत, आपण पॉझिटिव्ह आहोत की निगेटीव्ह याच भिती खाली ते वावरतांना दिसून येत आहे. 

हेही वाचा -  परभणीत अहवालच मिळत नसल्यामुळे शिक्षकांची धाकधुक 

आरोग्य विभागाकडून रिपोर्टबाबत प्रचंड अनास्था 
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतांना, जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणा मात्र गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते. ता. १७ नोव्हेंबरपासबन शहरात जवळपास दोन हजारावर शिक्षकांनी स्वतःच्या टेस्ट करून घेतल्या. ता. १८ नोव्हेंबरपर्यंतच्या टेस्टचे काही अहवाल आले. परंतु ता.१९ नोव्हेंबर पासून घेतलेल्या स्वॅबचे अहवाल मात्र अद्यापही मिळाले नाहीत, असे अनेक शिक्षकांचे म्हणने आहे. 

हेही वाचा -  परभणीच्या शाळा, महाविद्यालयात यंत्रणा लागली तयारीला 

अहवाल मिळणार तरी कसे ? 
शहरात पालिकेच्या सात आरोग्य केंद्रात स्वॅब घेतले जात आहेत. तेथे देखील हिच परिस्थिती आहे. सिटी क्लब येथील संकलन केंद्रात तर ता. २१ नोव्हेंबर पासून घेतलेले स्वॅब तपासणीसाठी देखील पावठले नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे अन्य केंद्रावरील स्वॅब देखील मंगळवा (ता.२४) पर्यंत तेथेच पडून आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरटीपीसीर टेस्टींग लॅबची क्षमता दररोज दोनशे टेस्टची असल्याचे सांगण्यात येते. तर जिल्ह्यात आठ ते नऊ हजार शिक्षक कर्मचारी आहेत. ते नांदेड, औरंगाबाद येथे पाठवले जात असल्याचे सांगीतले जाते. परंतू, २१ तारखेला घेतलेले स्वॅब २४ नोव्हेंबरपर्यंत तेथेच पडून राहिले तर ते टेस्टला जाणार कधी, त्याचा अहवाल मिळणार कधी व त्याचा दर्जा काय राहिल याबद्दल शंका उपस्थित होत आहे. 

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking type in Parbhani, teacher's swab still lying in the center on the third day, Parbhani News