esakal | जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा; हिंगोली शहरातील लसीकरण बंद

बोलून बातमी शोधा

लसीकरण
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा; हिंगोली शहरातील लसीकरण बंद
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा निर्माण झाला असून हिंगोली शहरातील लस संपल्याने लसीकरण बंद झाले आहे. तर जिल्ह्यात इतर ठिकाणी केवळ दिड हजार लस उपलब्ध आहे. ती केवळ एकाच दिवसात संपणार आहे. आरोग्य विभागाने एक लाख दहा हजार लसीची मागणी केली आहे.

जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, २४ प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन खाजगी रुग्णालयात आतापर्यंत ७० हजार ८५५ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी दहा हजार कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली होती. सध्या लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र लसीचा तुटवडा होत आहे. हिंगोली शहरातील लसीचा साठा संपल्याने नगरपरिषदेच्या कल्याण मंडपात सुरु असलेले लसीकरण थांबले आहे. तर जिल्ह्यात इतर ठिकाणी केवळ दिड हजार लस उपलब्ध आहे.

आरोग्य विभागाने जिल्ह्यासाठी एक लाख दहा हजार लसीची मागणी केली असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे यांनी सांगितले आहे. दरम्यान जिल्ह्यात लसीकरणाची जनजागृती झाल्याने ठिकठिकाणी असलेल्या लसीकरण केंद्रावर लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. ठोंबरे यांनी सांगितले. लवकरच लस उपलब्ध होणार असून लसीकरण नियमित सुरु राहणार असल्याचे देखील ते म्हणाले. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद देत आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा होणार नाही याकडे जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागाने लक्ष देऊन लस उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे