esakal | बाळापुरात कोरोना टेस्ट किटचा तुटवडा; वैद्यकीय अधिक्षक राहतात गैरहजर

बोलून बातमी शोधा

कोविड टेस्ट
बाळापुरात कोरोना टेस्ट किटचा तुटवडा; वैद्यकीय अधिक्षक राहतात गैरहजर
sakal_logo
By
सय्यद अतीक

आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : येथील ग्रामीण रुग्णालयात मागील दोन दिवसापासून कोरोना टेस्ट करणाऱ्या कीटचा तुटवडा होत असल्याने अनेक जणांना तात्काळ कोरोना चाचणी अहवाल मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हे नेहमी गैरहजर राहत असल्याने रुग्णच्या वतीने नाराजी व्यक्त होत आहे.

आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय अकोला ते हैदराबाद जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आहे. या रुग्णालयांमध्ये अपघाती रुग्ण, महिला प्रस्तुती व इतर आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात परंतु मागील वर्षापासून कोरोना आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत. कोरोना चाचणी अहवालात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने सध्या सर्वांचे लक्ष कोरोना आजारावरच आहे. सध्या आरोग्य विभागांना २४ तास रुग्णांची सेवा करावी लागत आहे. ज्यामध्ये बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे नित्यनियमाने आपली सेवा बजावत आहेत परंतु येथील वैद्यकीय अधीक्षक हे येथे मुख्यालय न रहाता बाहेर गावी राहुन फोनवर माहिती घेत असल्याची चर्चा येथे उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांतुन होत आहे.

सध्या सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने बाळापूर शहरात विनाकारण फिरणाऱ्या रिकामटेकडे यांची पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात येत आहे. याच धर्तीवर दोन दिवसापूर्वी येथे ५२ जणांची चाचणी करण्यात आली होती ज्यामध्ये दोन बाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतर बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना टेस्ट किटचा तुटवडा झाल्याने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्याची केली जाणारी टेस्ट करण्याचे काम थांबले आहे. याबाबत रुग्णालय अधीक्षकांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सध्या जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कामाचा भार आहे. आणि काही जण नोकरी करतात मात्र उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम करीत असल्याची चर्चा आहे.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी हे दररोज इमाने इतबारे आपली सेवा बजावून कोरोना काळातही रुग्णांना चांगली सेवा देत आहेत परंतु वैद्यकीय अधीक्षक हे नेहमी रुग्णालयात न येता गैरहजर राहत असल्याचे रुग्णालच्या वतीने बोलल्या जात आहे. वैद्यकीय अधीक्षक आणि कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात ग्रामीण रुग्णालयात दररोज उपस्थित राहून रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन इतर रुग्णावर उपचार करावेत अशी मागणी रुग्णांच्या वतीने होत आहे.

येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी कोरोना महामारी च्या काळात दररोज रुग्णालयात उपस्थित राहून मुख्यालयी रहावे व रुग्णावर उपचार करावे व रुग्णांना वेळेवर उपचार द्यावेत.

- ठाकूरसिंग बावरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष, हिंगोली.

संपादन- प्रल्हाद कांबळे