हेडफोन वापरताय, तर मग हे माहिती हवेच!

संदीप लांडगे
Wednesday, 6 November 2019

 • वापरकर्त्या 40 टक्के तरुणांना कानांचे आजार 
 • रक्तदाब, नैराश्‍य अन्‌ वाढती चिडचिड 

औरंगाबाद - मोबाईल हेडफोन, इयरफोन किंवा ब्लूटूथच्या अतिवापरामुळे युवकांमध्ये कानांच्या आजाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय वर्तुळातून नोंदविण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांतच 18 ते 30 वयोगटांतील 40 टक्के तरुणांमध्ये कानांचे आजार वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सतत लावून ठेवलेले हेडफोन, इयरफोन व ब्लूटूथमुळे
कानांच्या दुखण्यांबरोबरच रक्तदाब, नैराश्‍य, चिडचिड यामुळे मानसिक आजारही बळावत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

शहरातील कान-नाक आणि घसा तज्ज्ञांशी 'सकाळ'ने संवाद साधल्यावर कानांच्या दुखण्याचे आणखी एक कारण समोर आले. नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणाच्या ध्वनिलहरी कानाच्या पडद्यावर पडल्याने अंतर्कर्णातील पेशी खराब होऊन कधी कधी कायमस्वरूपी बधिरत्व येते. त्याचा परिणाम लगेच जाणवला नाही तरी, चाळिशीनंतर येण्यास सुरवात होते. ब्लूटूथ,
इयरफोन आणि हेडफोनमुळे आवाज थेट कानांच्या पडद्यावर जाऊन आदळतो. क्षमतेपेक्षा जास्त ध्वनिलहरी कानांच्या पडद्यावर पडल्याने तो फुटण्याचीही भीती असते. तसेच यातून ऐकू न येण्याबरोबरच कानांचे अन्य आजारही वाढीस लागतात. मोबाईलचे हेडफोन, ब्लूटूथच्या अतिवापराने महाविद्यालयातील तरुणांमध्ये कानांच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

 
पंचविशीतच त्रास 

पूर्वी वयोमानामुळे साधारणपणे 50 ते 60 वर्षांनंतर कानांचे आजार होत असत. मात्र, मागील दहा वर्षांपासून यात झपाट्याने वाढ झाली असून सध्या वयोवृद्धांपेक्षा तरुणांमध्येच कानांची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. ऍण्ड्रॉईड फोनचा अतिवापर तरुण पिढी करीत आहे. मोबाईलवर डीजे, थ्रीडी, एचडी प्रकारात मोठ्याने गाणे किंवा संगीत ऐकण्यामुळे कानांच्या पडद्यावर मोठ्या प्रमाणात आघात होतो. परिणामी, आता पंचविशीमध्येच रुग्ण मोठ्या संख्येने सापडू लागले आहेत. सततच्या वापराने श्रवणपेशी खराब होऊन कायमस्वरूपी कर्णबधिरत्वाची समस्या वाढू लागली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये ऐकू न येण्याच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. निपुण शर्मा यांनी सांगितले.  

...तर तपासणी करा 

कानांच्या पडद्याला जखम किंवा छिद्र पडले असेल तर कानात कुरतडल्यासारखा आवाज येतो. त्यामुळे कान ठणकणे, कान जड पडणे, मागची बाजू दुखणे, आवाज येणे, मोठ्या आवाजामुळे कानांवर ताण येत असेल तर ताबडतोब डॉक्‍टरांकडून तपासणी करून घ्या. 
 

अंघोळ किंवा पाण्यात पोहल्यानंतर कानातील पाणी काढणे गरजेचे असते. कारण, कानात पाणी साठून राहिल्यास मळ साचण्याची किंवा कानात बुरशी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे कानात खाज सुटते. त्यामुळे अनेक नागरिक हाताची बोटे, पेन, चावी, काडी, पेन्सिल कानात घालतात. अशा सवयी टाळण्यासाठी कान कोरडा राहील, याची काळजी घ्या. ठणकत असल्यास रात्री झोपताना कानात डॉक्‍टरांच्या सल्ल्याने ड्रॉप्स टाका. रस्त्यांवरील कानातल्या मळ काढणाऱ्यांकडून कान स्वच्छ करू नये. 
- डॉ. श्रीनिवास निकम, कान-नाक-घसा तज्ज्ञ 
 
वयोमानामुळे ज्येष्ठांमध्ये कानांचे आजार वाढत जातात. मात्र, मागील काही वर्षांपासून मोबाईलच्या अतिवापरामुळे युवकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढले आहे. ब्लूटूथ, हेडफोनच्या
अतिवापरामुळे ऐकू न येणे व त्यासंबंधी वेगवेगळे आजार तरुणांमध्ये वाढत चालले आहेत. 
- डॉ. किशोर कुलकर्णी, कान-नाक-घसा तज्ज्ञ 

 

 
अतिवापरामुळे होणारे आजार 

 • ऐकायला कमी येणे 
 • स्पष्टपणे ऐकू न येणे 
 • रक्तदाब, मानसिक आजार 

 
घ्यावयाची काळजी 

 • अतिकर्कश आवाजाच्या ठिकाणी जाणे टाळावे 
 • कानात काडी, पेन अशा वस्तू घालणे टाळा 
 • मोबाईल हेडफोन, ब्लूटूथचा अतिवापर टाळावा 
 • कानांत पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. 
 • अतिआवाजाच्या ठिकाणी कानांमध्ये कापसाचा बोळा 
 • किंवा अन्य सुरक्षित उपकरणांचा वापर करावा. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Side effects of headphones