esakal | मराठवाड्यात मंगळवारपासून परभणीच्या खासदारांचे स्वाक्षरी मोहीम, कशासाठी ते वाचा... 
sakal

बोलून बातमी शोधा

download

वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७०:३० टक्क्यांचा फॉर्म्युला रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक सप्टेंबरपासून मराठवाडाभर स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे.

मराठवाड्यात मंगळवारपासून परभणीच्या खासदारांचे स्वाक्षरी मोहीम, कशासाठी ते वाचा... 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७०:३० टक्क्यांचा फॉर्म्युला रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक सप्टेंबरपासून मराठवाडाभर स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. 


वैद्यकीय प्रवेशासाठी सध्या महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात असलेला व मराठवाड्यावर घोर अन्याय करणारा ७०:३० टक्के हा फॉर्म्युला रद्द करावा, या मागणीसाठी खासदार जाधव यांनी पुढाकार घेऊन जनआंदोलन उभारले आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी मराठवाड्यावरील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे ७०:३० टक्के हे सूत्र रद्द करण्याचे साकडे घातले. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. हा फॉर्म्युला रद्द होईपर्यंत मराठवाडाभर जनआंदोलनाचा निर्धार जाधव यांनी बोलून दाखविला आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून एक सप्टेंबरपासून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वाक्षऱ्यांचे हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात येणार आहे. या मोहिमेत मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे. 


पालकमंत्र्यांसमोर तीव्र निदर्शने
या आंदोलनाला मराठवाड्याच्या विविध भागातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. १५ ऑगस्ट रोजी खासदार श्री.जाधव यांच्या नेतृत्वाखाली याच मागणीसाठी पालकमंत्र्यांसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच पालकांच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. तेव्हा पालकमंत्र्यांनी हा विषय राज्याच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत ठेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.दरम्यान श्री. जाधव यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मराठवाड्यावरील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे ७०:३० टक्के हे सूत्र रद्द करावे म्हणून साकडे घातले. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

हेही वाचा - रुग्ण वाढल्याने तपासणीसह  कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष...कुठे ते वाचा

स्वाक्षऱ्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करणार 
जोपर्यंत हे सुत्र रद्द होत नाही तोपर्यंत मराठवाडाभर व्यापक प्रमाणावर जन आंदोलन छेडले जाणार असल्याचा निर्धार श्री. जाधव यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून येत्या एक सप्टेंबरपासून मराठवाडाभर नागरिकांकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. नंतर स्वाक्षऱ्यांचे हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. तेव्हा या मोहिमेत मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि मराठवाड्याची एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन खा.संजय जाधव यांनी केले आहे. 

हेही वाचा - जेईई - नीट परिक्षा पुढे ढकलण्यासाठी कॉँग्रेसचे नांदेडला आंदोलन

निवेदनावर स्वाक्षऱ्या करून नागरिकांनी प्रतिसाद द्यावा
स्वाक्षऱ्या घेण्यासाठी परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावागावात व शहरातील वार्डावार्डात पालक, विद्यार्थी व कार्यकर्ते येतील. तेव्हा त्यांच्याकडील निवेदनावर स्वाक्षऱ्या करून नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन श्री. जाधव, खासदार डॉ. फौजिया खान, माजी मंत्री आमदार सुरेश वरपूडकर, आमदार डॉ. राहूल पाटील, आमदार बाबाजानी दुर्राणी आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले आहे. 

संपादन ः राजन मंगरुळकर

loading image