तीस किलो चांदीची तस्करी, सापळा लावून चौघा जणांना पोलिसांनी केले अटक

उमेश वाघमारे
Saturday, 12 September 2020

चांदीची तस्करी करणाऱ्या चार संशयितांसह ३० किलो चांदी दहशतवाद विरोधी पथक व चंदनझिरा पोलिसांनी शनिवारी (ता.१२) सकाळी जालना-औरंगाबाद मार्गावरील नागेडवाडी टोलनाका येथे सापळा लावून जप्त केले आहे.

जालना : चांदीची तस्करी करणाऱ्या चार संशयितांसह ३० किलो चांदी दहशतवाद विरोधी पथक व चंदनझिरा पोलिसांनी शनिवारी (ता.१२) सकाळी जालना-औरंगाबाद मार्गावरील नागेडवाडी टोलनाका येथे सापळा लावून जप्त केले आहे. ही चांदी औरंगाबाद येथून नांदेड येथे घेऊन जात असल्याची कबुली या चौघांनी पोलिसांना दिली आहे.

औरंगाबाद येथून काही जण जालन्याकडे एका चारचाकी वाहनाने निघाल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार दशहतवादी पथकाने चंदनझिरा पोलिसांची मदत घेत औरंगाबाद-जालना मार्गावरील नागेवाडी टोलनाका येथे सापळा लावला. दरम्यान संशयित वाहन आल्यानंतर पोलिसांनी या वाहनाला ताब्यात घेऊन झाडती घेतली.

प्रत्येक जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प, जालना पॅटर्न सर्वत्र राबविणार,...

त्यावेळी विविध वजनाचे २५ गट्टू चांदी पोलिसांना आढळून आली. या चांदीचे वजन केले असता ती ३० किलो भरली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी प्रवीण नंदलाल भोमा (रा.कुंभारवाडा, औरंगपुरा, औरंगाबाद), अस्लमखान मसुदखान (रा. बेगमपुरा, औरंगाबाद), मनोज ओमप्रकाश वर्मा (रा.देवानगर, औरंगाबाद), सय्यद फारूख सय्यद हमीदोद्दीन (रा. देवानगर, औरंगाबाद) या ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी ३० किलो चांदी व चारचाकी वाहन असा एकूण २६ लाख ८० हजार ३३६ रुयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान ३० किलो चांदी औरंगाबाद येथून नांदेडला हे चौघे जण विक्रीसाठी घेऊन जात होते.

हे चांदी नांदेड येथील सराफा व्यापाऱ्यांना विक्री करण्याचा बेत या चौघांचा होता असा संशय पोलिसांना असून ही चांदी कोठुन आली याचा तपास ही पोलिस करत आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. गंदम, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, दहशतवाद विरोधी पथकाचे अंकुश राठोड, शेख रशीद, दिनेश बरडे, संजय गवळी, अभिजीत अडीयाल, तौसीफ पठाण, अनिल काळे यांनी केली.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silver Smugglers Arrested Jalna News